एसटी कर्मचारी आणि महामंडळाकडून केरळ पूरग्रस्तांना १० कोटींची मदत

एसटी कर्मचारी आणि महामंडळाकडून केरळ पूरग्रस्तांना १० कोटींची मदत

मुख्यमंत्री धनादेश देताना

केरळ येथील पूरग्रस्तांना मदतीसाठी एसटीचे कर्मचारी तसेच महामंडळ पुढे सरसावले आहे. पूरग्रस्तांना मदतीसाठी एसटी कर्मचारी तसेच महामंडळाच्या वतीने १० कोटी रुपयांची मदत देण्यात आली. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांनी आज या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला. आर्थिक तोट्यात असतानाही एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून ही मदत करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनाची मदत

दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी मंत्रालयात एसटीच्या मान्यताप्राप्त तसेच इतर कामगार संघटनांसमवेत बैठक झाली. त्यात केरळ येथील पुरग्रस्तांना कामगारांमार्फत मदत करण्याबाबत चर्चा झाली. सर्व कामगार संघटनांनी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन पुरग्रस्तांना मदतीसाठी देण्याची तयारी दर्शविली. पण कर्मचाऱ्यांच्या वेतनातून फक्त अर्ध्या दिवसाचे वेतन देण्यात यावे आणि त्यात तेवढीच रक्कम एसटी प्रशासनामार्फत देण्यात यावी, अशी सूचना मंत्री रावते यांनी केली. त्यानुसार मदतीचा १० कोटी रुपयांचा धनादेश दुपारी मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द करण्यात आला.

कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान

एसटी कर्मचाऱ्यांनी तसेच एसटी महामंडळाने आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची नेहमीच भूमिका घेतली आहे. यापूर्वीही महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी एसटी कर्मचारी आणि महामंडळ पुढे सरसावले होते. आता केरळ राज्यावर मोठे संकट कोसळले असून तेथील नागरिकांना मदतीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी स्वतःहून तयारी दर्शविली. कर्मचाऱ्यांची ही भूमिका मानवतेची तसेच इतर सर्वांसाठी आदर्शवत अशी आहे. कर्मचाऱ्यांच्या मदतीत एसटी महामंडळामार्फतही तेवढेच योगदान देऊन हा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला असे रावतेंनी सांगितले आहे.

First Published on: August 23, 2018 6:55 PM
Exit mobile version