मुंबई विद्यापीठात इन्क्युबेशन सेंटर सुरू

मुंबई विद्यापीठात इन्क्युबेशन सेंटर सुरू

मुंबई विद्यापीठातील आजी-माजी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना त्यांच्या नवसंकल्पनातून उद्योग निर्मितीसाठीचे व्यासपीठ मुंबई विद्यापीठाने उपलब्ध केले आहे. नोबेल पारितोषिक विजेते सर रिचर्ड जॉन रॉबर्ट्स यांच्या हस्ते बुधवारी इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी सुमारे 20 प्रकल्प यावेळी सादर केले. यामध्ये पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी विकसित केलेली पद्धती, बॅटरीचे आयुष्य वाढवणारे फंक्शनल नॅनो मटेरियल, निर्जीव वस्तूंच्या पडताळणीसाठी बारकोड सिस्टिम, टिचिंग-ट्रेनिंग अ‍ॅण्ड लर्निंग डेमोन्स्ट्रेशन किट ऑफ मेटालिक नॅनोस्ट्रक्चर, बायामॉलेक्युलर थर्मल एनालायझर आदी नावीन्यपूर्ण संशोधन यावेळी सादर करण्यात आले.

विद्यापीठाच्या ग्रीन टेक्नॉलॉजी विभागाच्या आवारातील या पहिल्या इन्क्युबेशन सेंटरच्या उद्घाटनासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्राफेसर रवींद्र कुलकर्णी, ऑर्गन विद्यापीठाच्या प्रोफेसर गेराल्डाईन रिचमंड, स्ट्रेथक्लाईड विद्यापीठाचे प्रोफेसर कॉलीग सक्लींग, थीनक्यू फार्माचे अध्यक्ष आणि मुख्य वैधानिक अधिकारी प्रोफेसर मुकूंद चोरघडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसी 2018 च्या अनुषंगाने विद्यापीठाने हे पाऊल उचलले असून, त्यासाठी महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह सोसायटीकडून विद्यापीठाला पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे प्र-कुलगुरू प्रोफेसर रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

लवकरच संचालकांची नेमणूक
नव उद्योजक संकल्पनांसाठी अनेक नामांकीत संस्था आणि उद्योग समूहांनी सहकार्य आणि मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या संपूर्ण प्रक्रियेला कार्यान्वित करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने इन्क्युबेशन सेंटरसाठी लवकरच संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक केली जाणार आहे.

First Published on: January 11, 2019 4:17 AM
Exit mobile version