चर्चगेट स्थानकावरील बंद पडलेले वैद्यकीय केंद्र सुरू

चर्चगेट स्थानकावरील बंद पडलेले वैद्यकीय केंद्र सुरू

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकाच्या बाजूला असलेले रेल्वेचे आपत्कालीन वैद्यकीय केंद्र मागील तीन महिन्यापासून बंद होते. त्यामुळे प्रवाशांना त्याचा काही उपयोग होत नव्हता. या संबंधीचे वृत्त दैनिक ‘आपलं महानगर’ने सर्व प्रथम प्रकाशित केल्यानंतर पश्चिम रेल्वेला जाग आली. त्यानंतर तात्काळ रेल्वे प्रशासनाने आपत्कालीन वैद्यकीय केंद्र पुन्हा सुरू करून तिथे एका डॉक्टरची नेमणूक केली आहे.

रेल्वे अपघातातील जखमी आणि रेल्वे प्रवासात अचानक प्रवाशांची प्रकृती बिघडल्यास त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय केंद्रे सुरू करण्याचे निर्देश हायकोर्टने दिले होते. त्यांची जबाबदारी खासगी हॉस्पिटल आणि औषध निर्माण कंपन्याकडे दिली आहे. मात्र त्यांनी त्याकडे पाठ फिरवल्यामुळे पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेट स्थानकावरील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र बंद पडले होते. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना गरज पडल्यावर वैद्यकीय सेवा मिळत नव्हती. अनेकदा रेल्वे प्रवाशांनी याबाबत तक्रार करूनसुद्धा काही फायदा होत नव्हता.

या केंद्रावर औषधोपचार घेण्यासाठी येणार्‍या प्रवासी रुग्णांची संख्या खूप कमी होती. त्यामुळे ते चालविणार्‍याचे दिवसेंदिवस नुकसान होऊ लागले होते. त्यात साधारणत: प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये भाडे, कर्मचार्‍यांचा पगार या सर्व गोष्टी आवाक्याबाहेर जात होत्या. त्यामुळे २० जानेवारी २०१९ रोजी हे केंद्र बंद करण्यात आले होते.

दैनिक ‘आपलं महानगर’ने या संबंधित वृत्त प्रकशित केल्यानंतर दक्षिण मुंबईचे आम आदमी पक्षाचे नेते गिरीश मिश्रा यांनी हा मुद्दा उचलून धरला. या संबंधित पश्चिम रेल्वेने रीतसर तक्रार केली. तीन महिन्यानंतर हे केंद्र अखेर सुरू करण्यात आले आहे. गिरीश मिश्रा यांनी सांगितले की, हायकोर्टच्या आदेश असूनसुद्धा चर्चगेट रेल्वे स्थानकांवरील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र मागील ३ महिन्यापासून बंद होते. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे कोर्टाच्या आदेशाचे पालन करत नाही. मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवरील बंद असलेल्या आपत्कालीन वैद्यकीय केंद्रांचे पुन्हा टेंडर काढावे. जोपर्यंत निविदा भरली जात नाही, तोपर्यंत रेल्वेने बंद असलेल्या आपत्कालीन वैद्यकीय केंद्रांवर डॉक्टर ठेवून प्रवाशांना सुविधा द्यावी.

First Published on: April 18, 2019 4:11 AM
Exit mobile version