‘फिट कामगार, फिट इंडिया’ संदेश देण्यासाठी हाफकिनच्या कर्मचार्‍याचा पिंपरी ते मुंबई सायकल प्रवास; गुणवंत कामगार पुरस्काराने गौरव

‘फिट कामगार, फिट इंडिया’ संदेश देण्यासाठी हाफकिनच्या कर्मचार्‍याचा पिंपरी ते मुंबई सायकल प्रवास; गुणवंत कामगार पुरस्काराने गौरव

राज्य सरकारने २०१५ मध्ये जाहीर केले गुणवंत कामगार पुरस्कार ९ फेब्रुवारी २०२१ ला प्रदान करण्यात आले. पुरस्कार जाहीर झालेले हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळातील कृष्णा ढोकले हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पिंपरीहून तब्बल ११ तासांचा सायकल प्रवास करत मुंबईला आले. कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते त्यांनी पुरस्कार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या फिट इंडिया उपक्रमांतर्गत ‘फिट कामगार, फिट इंडिया’ हा संदेश देण्यासाठी त्यांनी हा सायकल प्रवास केला.

पिंपरी येथील हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळामध्ये कार्यरत असलेले कृष्णा ढोकले हे गिर्यारोहक म्हणून ओळखले जातात. भारतातील सर्वोच्च शिखर व जगातील तिसर्‍या क्रमांकाचे शिखर माऊंट कांचनजुंगा, आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारो, माऊंट एव्हरेस्ट, माऊंट हनुमान तिब्बा, सह्याद्र पर्वत रांगामधील अवघड सुळके त्यांनी सर करत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. एव्हरेस्ट, कांचनजुंगा आणि किलीमांजारोवर यशस्वी चढाई करणारे कृष्णा ढोकले हे महाराष्ट्र सरकारमधील पहिले सरकारी कर्मचारी ठरले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने २०१५ मध्ये कृष्णा ढोकले यांना कामगार कल्याण मंडळातर्फे दिला जाणार गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर केला. मात्र काही तांत्रिक कारणामुळे हा पुरस्कार पुढे ढकलण्यात आला. आघाडी सरकारने २०१५ मधील कामगारांचे पुरस्कार ९ फेब्रुवारीला देण्याचे जाहीर केले. कोविडची परिस्थिती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘फिट इंडिया’च्या मंत्राच्या पार्श्वभूमीवर ‘फिट कामगार, फिट इंडिया’ हा नारा देण्यासाठी पिंपरी ते मुंबई असा १४० किलोमीटरचा प्रवास ढोकले यांनी सायकलवरून केला. ‘मी फिट तर माझे महामंडळ फिट, माझे महामंडळ फिट तर माझा देश फिट’ त्याचबरोबर देशातील कामगर फिट तर देश फिट हा संदेश देण्यासाठी त्यांनी सायकलने प्रवास करून पुरस्कार घ्यायला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या प्रवासाला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सोमवारी दुपारी २ वाजता हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रवास करत ते मंगळवारी रात्री १ वाजता परळमधील हाफकिन महामंडळाच्या कार्यालयात पोहचले. प्रवासामध्ये अनेक अडचणी आल्या. पण त्यावर मात करत तब्बल ११ तास सायकल चालवत ढोकले यांनी मुंबई गाठली. हाफकिन महामंडळामध्ये आराम केल्यानंतर दुपारी १ वाजता ते पुरस्कार घेण्यासाठी सायकलवरूनच गेले. ढोकले यांना गिर्यारोहनाप्रमाणेच कराटे व मार्शल आर्टची आवड असल्याने दररोज सकाळी व्यायाम करतात. मात्र सलग इतका वेळ त्यांनी यापूर्वी कधीच सायकल चालवली नव्हती.

कृष्णा ढोकले यांची कामगिरी

सह्याद्री पर्वत रांगामधील कोकण कडा, बाबू कडा, भैरवगड, कताळधार, वजीर, नागफणी, खडापारशी असे अनेक कडे सुळक्यांसह सह्याद्रीतील ७० हुन अधिक गिर्यारोहण मोहीम यशस्वी केल्या आहेत. त्याचबरोबर ६० मोहिमांचे नेतृत्व केले आहे. माऊंट श्रीकंठ (६१५० मीटर), माऊंट इयर्लंड (६१८० मीटर), माऊंट एव्हरेस्ट (८८४८ मीटर), माऊंट हनुमान तिब्बा (५९१० मीटर), माऊंट एलब्रूस (५६४२ मीटर), माऊंट कॅथड्रेल (६१७२मीटर), माऊंट मेरा (६४७० मीटर), माऊंट कांचनजुंगा (८५८६ मीटर) आणि किलीमांजारो (५८९० मिटर) यांच्यावर यशस्वी चढाई केली आहे. २००८ मध्ये तैल बैला २५० फूट कातळकड्यावर विना साहित्य एकट्याने चढाई करत विक्रम केला. लोणावळ्यातील नागफणी सुळक्यावर रात्रीच्या वेळी एकट्याने चढाई केली आहे. १५ ऑगस्ट २०१६ साली भारताच्या स्वातंत्र्य दिनी युरोप खंडातील सर्वोच्च शिखरावर भारतीय तिरंगा ध्वज फडकविला.

असा केला प्रवास

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ उपक्रमांतर्गत देशातील कामगार स्वस्थ तर देश स्वस्थ हा संदेश देण्यासाठी आपण सायकलनेच गुणवंत कामगार पुरस्कार घेण्याला जाण्याचे ठरवले. त्यानुसार तब्बल १२ तास प्रवास करत मुंबईला पोहोचलो. या प्रवासामध्ये मला अनेक अडचणी आले. पण त्यावर मात करत प्रवास केला. पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद वाटत आहे.
– कृष्णा ढोकले, गुणवंत कामगार पुरस्कार विजेते
First Published on: February 9, 2021 9:05 PM
Exit mobile version