मुंबईतील सर्व पुलांची श्वेतपत्रिका काढा – शरद पवार

मुंबईतील सर्व पुलांची श्वेतपत्रिका काढा – शरद पवार

शरद पवार

सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी घडलेली पूल दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. ११ नोव्हेंबर २०१५ रोजी मध्य रेल्वेने राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहून हा पूल धोकादायक असल्याचे सांगितले होते. मात्र तरिही राज्य सराकरने त्यावर काहीच कार्यवाही केली नाही. तसेच या पुलाचे ऑडिट झाले असल्याची मिळत आहे, तरी ही हा पूल कोसळला. त्यामुळे या पुलाच्या ऑडिटचीच चौकशी झाली पाहीजे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, नागरिकांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी मुंबईतल्या सर्वच पुलांची श्वेतपत्रिका काढण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढत आहे

मुंबईत विरार ते चर्चगेट, कर्जत ते सीएसटी रोज १ कोटी लोक प्रवास करतात. दोन्ही मार्गावर दिवसाला १५ ते २० अपघात होतात. वर्षाला ३ हजार लोकांचा मृत्यु होतो. तर महिन्याला २-३ हजार प्रवासी जखमी होतात. दिवसेंदिवस रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. मुंबई सारख्या शहरात नागरिकांचा प्रवास सुखकर कसा होईल, याकडे लक्ष दिले गेले पाहीजे. त्याची सुरुवात रेल्वे स्टेशन पासून करण्याची गरज असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.


बुलेट ट्रेनचा पैसा मुंबई रेल्वेच्या विकासाला द्या

भाजप मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी सव्वा लाख कोटी खर्च करणार आहे. मुंबईला बुलेट ट्रेनची गरज नाही. त्यापेक्षा हा पैसा मुंबईच्या दोन्ही रेल्वे मार्गाचा विकास करण्यासाठी खर्च करण्यात यावा. तसेच बुलेट ट्रेनपेक्षा मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते कोलकाता, कोलकाता ते चेन्नई, चेन्नई ते मुंबई अशा चार शहरांना रेल्वे सर्कलच्या जाळ्यांनी जोडण्यात यावे, त्याचा देशाच्या विकासात फायदा होईल, अशी प्रतिक्रिया पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
First Published on: March 15, 2019 5:25 PM
Exit mobile version