लुटीचं राज्य भाजपाकडे…; कर्नाटक पराभवावरून संजय राऊतांची टीका

लुटीचं राज्य भाजपाकडे…; कर्नाटक पराभवावरून संजय राऊतांची टीका

मुंबई : कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल बुधवारी (13 मे) जाहीर झाला आणि या राज्यामध्ये काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवून ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. तर भाजपला त्यांचा अतिआत्मविश्वास पराभूत होण्यासाठी कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र राज्य लुटले आहे. ही लुट आहे नैतिकता नाही. त्यामुळे लुटीचं राज्य त्यांच्याकडे फार काळ टिकणार नाही.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे मुंख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर राज्याचे मुख्यमंत्री अशी सगळी आर्मी लावूनसुद्धा त्या आर्मीचा पराभव कर्नाटकच्या जनतेने केला. म्हणजे हुकुमशाहीचा पराभव सामान्य जनता करते हे पुन्हा एकदा दिसून आले. इंदिरा गांधीच्या बाबतीत 1978 साली झाले होते. त्याची सुरूवात पुन्हा एकदा सुरू झाले कर्नाटकमधून. त्याच्यामुळे कर्नाटक तो झांकी है महाराष्ट्र अभी बाकी है, कर्नाटक तो झांकी है पुरा देश अभी बाकी है. आम्ही 2024 ची तयारी करतो आहोत. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र राज्य लुटले आहे. ही लुट आहे नैतिकता नाही. त्याच्यामुळे लुटीचं राज्य त्यांच्याकडे फार काळ टिकणार नाही, असा हल्लोबोल संजय राऊत यांनी केला.

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर भाजपच्या देशभरात सुरू असलेल्या विजयी घोडदौडीला कर्नाटकमधील जनतेने रोखली आहे. कर्नाटकात सलग दुसर्‍यांदा सत्ता मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या प्रचार यंत्रणेने पूर्ण जोर लावूनही जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमताचा कौल दिला आणि मागील 38 वर्षांची सत्तापालट करण्याची परंपरा कायम ठेवली. कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. या निकालात मतदानोत्तर चाचण्यांच्या निष्कर्षांच्या पुढे झेप घेत काँग्रेसने 136 जागा जिंकल्या, तर भाजपला 65 जागांवर समाधान मानावे लागले.

2018 च्या निवडणुकीत जनता दल सेक्युलर(जेडीएस) किंगमेकर ठरले होते, परंतु मतदारांनी यंदा ती संधीच दिली नाही. जेडीएसला अवघ्या 19 जागा मिळाल्या. काँग्रेसने आज रविवारी बंगळुरूत आपल्या विजयी आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरल्यानंतर काँग्रेसकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात येईल, असे म्हटले जात आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत काँग्रेसने दिलेली 5 आश्वासने पूर्ण करण्याची ग्वाही मतदारांना दिली आहे.

 

First Published on: May 14, 2023 10:52 AM
Exit mobile version