मुख्यामंत्री योगींच्या टिकेनंतर वातावरण तापले

मुख्यामंत्री योगींच्या टिकेनंतर वातावरण तापले

लॉकडाऊनमुळे देशभरातील राज्यातून उत्तर प्रदेश आणि बिहारचे कामगार मोठ्या प्रमाणात स्वराज्यात परतले आहेत. उत्तर प्रदेशने आता मायग्रेशन कमिशन स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तसेच आता इतर राज्यांना उत्तर प्रदेशमधील कामगार हवे असल्यास त्या राज्याची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते. त्यानंतर आता महाराष्ट्रातील वातावरण तापले असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी योगी आदित्यनाथ यांना खडेबोल सुनावले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योगींना जशासतसे उत्तर दिले आहे. कामगारांसाठी उत्तर प्रदेशची परवानगी घ्यायची असेल तर मग महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही, हेही योगी आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावे, असे प्रत्युत्तर राज ठाकरेंनी दिले आहे.

योगी आदित्यनाथ यांनी मायग्रेशन कमिशनची स्थापना करणार असल्याची घोषणा केली. तसेच यापुढे इतर राज्यातील उद्योगांना उत्तर प्रदेशच्या कामगारांची गरज भासल्यास राज्याची परवानगी घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी दोन ट्विट करत योगींचा समाचार घेतला. यापुढे राज्य सरकारने या गोष्टींकडे गांभीर्याने पाहावे. कामगार राज्यात आणताना त्यांची नोंद करावी. पोलीस स्टेशनमध्ये त्यांची ओळख आणि फोटो असलेच पाहिजेत, तरच त्यांना महाराष्ट्रामध्ये प्रवेश द्यावा असेही म्हणालेत.

या ट्विटनंतर राज ठाकरे पुढे म्हणाले की, ते जर उत्तर प्रदेशचे कामगार असतील तर त्यांना फक्त उत्तर प्रदेशमध्येच मतदानाचा हक्क मिळेल. कारण कायद्याने आपल्याकडे एका मतदाराला दोन ठिकाणी मतदान करता येत नाही ह्याची जाणीव मुख्यमंत्री आदित्यनाथांनी ठेवावी, महाराष्ट्राने आणि देशातल्या इतर राज्यांनीही ठेवावी असे राज ठाकरे म्हणालेत.
दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या आरोपाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील जशासतसे उत्तर दिले आहे. योगी आदित्यनाथ यांच्याकडून ही अपेक्षा नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे. खूप मोठ्या प्रमाणावर उत्तर प्रदेशचे मजूर येथे आहेत. या उभारणीमध्ये त्यांचा वाटाही आम्ही कधी नाकारलेला नाही. ते काम करतात ही वस्तुस्थिती आहे. श्रमाचे दाम आपण देतोय, हे देखील खरं आहे. त्यामुळे आता पुढेही मावशीच सांभाळणार आहे आणि ती काळजी आम्ही निश्चितच घेऊ, असे बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.

First Published on: May 26, 2020 5:11 AM
Exit mobile version