आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती

आरे कॉलनीत होणार्‍या मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. रातोरात झाडांची कत्तल आम्हाला मंजूर नाही, आरेतील एक पानही तोडू देणार नाही. कारशेडचे पुनर्परीक्षण केल्याशिवाय पुढील कामे होणार नाहीत, असे निर्देश दिले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यावर पत्रकारांशी बोलताना शुक्रवारी दिली. कोणतीही विकासकामे रखडणार नाहीत, पण आपले वैभव गमावून विकासकामे होणार नाहीत. ही स्थगिती फक्त कारशेडच्या कामाला आहे. त्यामुळे मेट्रोचे काम सुरूच राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

विधिमंडळ वार्ताहर कक्षात उद्धव ठाकरेंनी वार्तालाप केला. यावेळी सरकारची पुढची ध्येयधोरणं आणि दिशा त्यांनी स्पष्ट केली. ‘मुख्यमंत्री म्हणून अनपेक्षितपणे आलोय. हे तीन पक्षांचे सरकार आहे. विविध अडचणींचा सामना आम्हाला करायचाय. आतापर्यंत दोन ते तीन वेळाच मंत्रालयात आलो आहे. प्रथा, परंपरा माहीत नसताना शिवधनुष्य उचलले आहे’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.शिवसेना यापूर्वीही सरकारमध्ये होती. त्यावर नेहमी टीका केली जायची. यावरही उद्धव ठाकरेंनी भूमिका सांगितली. ‘टीका करताना चुका कळायला हव्या, फक्त ओरबाडणे म्हणजे पत्रकारिता नव्हे.

आम्ही सत्तेत होतो की नव्हतो ही भूमिका कुणालाच कळली नाही. घोषणांची अंमलबजावणी होते की नाही हे बघण्याचे काम आम्ही केले, असेही त्यांनी सांगितले. सचिवांसोबत ओळख झाली. हे आपल्या सर्वांचे सरकार आहे, जनतेशी नम्रपणाने वागणारे सरकार आहे. कराच्या रूपाने जो पैसा आपल्याकडे येतो, तो योग्य ठिकाणी वापरला पाहिजे, जनतेच्या पैशाची उधळपट्टी होणार नाही. सगळी कामे करण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या खिशातला पैसा आहे. मुंबईत जन्मलेला पहिला मुख्यमंत्री मी आहे. माझ्या मुंबईसाठी काय करायचेय त्याचाही विचार सुरू आहे. शेतकर्‍यांनाही दिलेला शब्द पाळायचा आहे. आरे कारशेडला स्थगिती दिलेली आहे. कोणतेच विकासकाम रखडणार नाही, पण आपल्या हाताने आपले वैभव आपण गमावत असू तर तो विकास नाही. याचा पुनर्विचार होत नाही तोपर्यंत आरेचे काम होणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.

भगवा आवडता रंग-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे                                                                                  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शपथविधीसाठी भगव्या रंगाचा सदरा परिधान केला होता. मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारतानाही त्यांनी भगव्या रंगाचा सदरा परिधान केला होता. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना सदर्‍याच्या रंगाबाबत प्रश्न केला असता भगवा हा माझा जन्मभराचा आवडता रंग आहे. या रंगाच्या सदर्‍याला कुठल्याही लॉन्ड्रीमध्ये धुतले तरीही त्याचा रंग जाणार नाही, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांची
कोर्टाच्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच! जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे 15,000 कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते. अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि 15 वर्षांत आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील. – देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री

First Published on: November 30, 2019 5:45 AM
Exit mobile version