ठाण्यात चक्क कांदा बटाटा चोरी

ठाण्यात चक्क कांदा बटाटा चोरी

कांद्याची दरवाढ

अवकाळी पाऊसाने कांदे बटाट्याच्या शेतीचे नुकसान झाले. बाजारात जाणवणार्‍या कांदा बटाट्यांच्या तुटवड्यामुळे भाव गगनाला भिडले. याचाच फायदा उठवत नशेच्या आहारी गेलेल्या दोघांनी कांदे-बटाटे चोरीचा नवा फंडा वापरून नशेसाठी पैसे मिळवण्याचा प्रकार उघड झाला आहे. ठाणे पोलिसांनी दोन नशेखोर चोरट्यांना पकडले आहे.

ठाणे शहरात मोबाईल, चैन स्नॅचिंग, लूट सारख्या चोरीच्या अनेक घटना पोलीस ठाण्यात दाखल होत असतानाच चक्क कांदे आणि बटाटे चोरीचा प्रकार समोर आल्याने पोलिसही चक्रावले आहेत. ठाणे नगर पोलीस ठाण्यात रोज दोन ते तीन तक्रारी मार्केटमधील व्यापारी तोंडी तक्रारी दाखल करीत होते. वाढत्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेऊन मार्केटमध्ये रात्रीच्यावेळी गस्त वाढवली.

शुक्रवारी रात्री पोलीस गस्तीवर असताना भाजी मार्केट मधून कळव्यातील महात्मा फुले नगर परिसरात राहणारे अविनाश कदम (30) आणि अशोक पवार यांना 60 किलो वजनाची कांद्याची गोणी घेऊन जाताना पहिले. पोलिसांनी त्यांना हटकले. ही चोरी ते नशेसाठी करत असल्याचे उघड झाले. महागलेले कांदे बटाटे विकून नशापाणी करण्यासाठी चोरट्यांकडून चोरी केली जात होती. पोलिसांनी दोघांवर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार दोघेही सराईत चोरटे असून नशेखोर आहेत. नशेसाठी चोरी केलेल्या कांद्याच्या गोणीची किंमत सध्या 4 हजार 800 रुपये असल्याचे सांगितले.

First Published on: November 18, 2019 5:22 AM
Exit mobile version