थकीत कर रकमेच्या वसुलीसाठी धोरणात्मक बदल

थकीत कर रकमेच्या वसुलीसाठी धोरणात्मक बदल

मुंबई पालिका निवडणूक आरक्षणाविरोधात फक्त ३ हरकती

मुंबईतील अनेक गृहनिर्माण संस्था, कमर्शियल कंपन्यांच्यावतीने मोठ्याप्रमाणात मालमत्ता कराची रक्कम थकवली जात आहे. मात्र या थकीत मालमत्ता कराच्या वसुलीबाबत महापालिकेने वारंवार दंडात्मक रक्कम भरण्यासाठी तसेच जप्तीची नोटीस पाठवूनही महापालिकेला दाद दिली जात नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या मालमत्तांच्या प्रॉपर्टी कार्डवरच आता थकीत मालमत्ता कराची रक्कम चढवली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेने जप्तीची नोटीस बजावलेल्या सर्वच मालमत्तांच्या प्रॉपर्टी कार्डवर थकीत मालमत्ता कराची रक्कम चढवली जाणार असून यापुढे कोणालाही मालमत्ता कराची रक्कम थकवून जमिनीच्या खरेदी – विक्रीचे आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत.

मालमत्ता कर हे आता महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे या कराची वसुली करण्यासाठी करनिर्धारण व संकलन खात्याच्या माध्यमातून कठोर पावले उचलली जात आहेत. या कराची वसुली करताना, मालमत्ता जप्त करणे, जलजोडणी खंडित करणे इत्यादींची तरतूद आहे. परंतु या सक्त वसुलीच्या कारवाईचा एक भाग आहे, तो म्हणजे जप्त केलेल्या मालमत्तांच्या मिळकत पत्रिकेवर (प्रॉपर्टी कार्ड) कराची बोजाची नोंद करण्याचीही तरतूद आहे. आजवर या तरतुदींचा वापर महापालिकेने केला नव्हता. परंतु आता या तरतुदीचा वापर केला जात असून एम/पूर्व विभागाने घाटकोपर येथील नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात सातत्याने पाठपुरावा करून एका मालमत्तेच्या मिळकत पत्रिकेवर बोजा चढविण्याची कारवाई पूर्ण केली आहे.

एम/पूर्व विभागातील देवनार इंडस्ट्रीज प्रिमायसेस सहकारी संस्था यांची २ कोटी १८ लाख ३३ हजार २६४ एवढी मालमत्ता कराची थकबाकी होती. परंतु वारंवार नोटीस देवूनही त्यांनी मालमत्ता कर भरला नव्हता. त्यामुळे मे महिन्यात महापालिकेने जप्तीचे वॉरंट बजावले होते. त्यामुळे विभाग कार्यालयाने नगर भूमापन अधिकारी कार्यालयास या मालमत्तेच्या मिळकत पत्रिकेवर मालमत्ता कराच्या थकीत रकमेचा बोजा चढविण्याची विनंती केली होती. त्यानुसार नगर भूमापन अधिकारी यांनी कराचा बोजा असल्याची फेरफार नोंद केली.

मालमत्ता पत्रिकेवर मालमत्ता कराची नोंद घेणे ही अतिशय महत्वाची बाब असून या मिळकती संदर्भात कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार झाल्यास महापालिकेच्या नियमानुसार ते गैरकायदेशीर ठरणार आहे. अशी कारवाई थकीत कर असलेल्या इतर मालमत्तांवरही करण्यात येणार आहे. तशी सर्व थकबाकीदारांनी आपल्या मालमत्ता कर वेळेत भरून अप्रिय कारवाई टाळावी असे आवाहन महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने केले आहे.

First Published on: February 3, 2019 4:38 AM
Exit mobile version