आरे वाचविण्यासाठी राष्ट्रवादीचे तीव्र आंदोलन

आरे वाचविण्यासाठी राष्ट्रवादीचे तीव्र आंदोलन

मुंबई – आरे कॉलनीत मेट्रो कारशेडला विरोध करीत मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे अध्यक्षा राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली रविवारी गोरेगाव येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. आरे येथे मेट्रो कारशेडसाठी कारशेड उभारण्यास पर्यावरणवाद्यांनी तीव्र विरोध केला. त्याचबरोबर शिवसेनेनेही सदर मेट्रो कारशेडला राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्यापूर्वी जोरदार विरोध केला होता. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यावर आक्रमकता दाखवत रविवारी सकाळच्या सुमारास मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या व माजी गटनेत्या, नगरसेविका राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घोषणाबाजी व फलकबाजी करीत उत्स्फूर्तपणे आंदोलन केले.

मेट्रो कारशेडसाठी मुंबईला प्राणवायू देणाऱ्या आरे जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. याची गंभीर दखल घेऊन आरे जंगल वाचवण्यासाठी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने रविवारी गोरेगाव येथे “आरे बचाव, मुंबई बचाव” आंदोलन करण्यात आले. आरेमधील झाडे तोडून मेट्रो कारशेड बनवू नये , राज्य सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ” प्रदूषण थांबवा,आरे वाचवा”, “आरे मुंबईची शान, कारशेड बांधून नका करू घाण”, “वन्यजीव वाचवा, आरे कारशेड थांबवा” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने आरेमध्ये मेट्रो कारशेड बनवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जोरदर विरोध करण्यात आला. आरे जंगल मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मेट्रो कारशेडमुळे येथील झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होईल. त्याचे दुष्परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होतील. हे नुकसान टाळण्यासाठी मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आरे वाचवाची हाक दिली, अशी माहिती राखी जाधव यांनी दिली.

First Published on: August 28, 2022 10:41 PM
Exit mobile version