वांद्रे स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडिट २ दिवसांत पूर्ण

वांद्रे स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडिट २ दिवसांत पूर्ण

Bandra Skywalk

वांद्रे स्थानक ते वांद्रे-कुर्ला संकुलाला जोडणार्‍या स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडिट हे अवघ्या दोन दिवसांत संपवण्याचा प्रताप महापालिकेच्या विभागाकडून करण्यात आलेला आहे. सीएसटी पादचारी पूल दुर्घटनेनंतर तातडीने हा स्कायवॉक २० मार्च रोजी बंद केला होता. आठवडाभर हा स्कायवॉक देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी बंद राहणार होता. पण अवघ्या दोन दिवसातच हे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात आल्याचे कळते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या स्कायवॉकशी संबंधित कामामुळे २५ मार्चपासून पादचार्‍यांसाठी हा स्कायवॉक बंद केला आहे.

गेल्या आठवड्यातच संपूर्ण स्कायवॉक देखभाल दुरूस्तीसाठी बंद करण्यात आला आहे, असे फलक महापालिकेने लावले होते. स्कायवॉकची कोणतीही देखभाल दुरूस्ती न करताच ऑडिटसाठी हा संपूर्ण स्कायवॉक बंद ठेवण्यात आला होता. महापालिकेच्या एजन्सीने या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट अवघ्या दोन दिवसात पूर्ण करत सोमवारपासून हा स्कायवॉक पुन्हा पादचार्‍यांच्या सेवेसाठी खुला केला आहे. संपूर्ण स्कायवॉक बंद केल्यामुळे बीकेसी, म्हाडा, एसआरए तसेच वांद्रे न्यायालय या परिसरातील कर्मचारी तसेच नागरिक हे रस्त्यावरून स्टेशनच्या दिशेने जात होते. त्यामुळेच वाहतूक कोंडीत मोठी भर पडली होती.

एसआरए मुख्यालयाच्या दिशेचा स्कायवॉकचा पर्याय बंद झाल्याने आता वांद्रे कोर्टाच्या दिशेनेच पादचार्‍यांना जाण्याशिवाय पर्याय नाही. वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसारही हा स्कायवॉक लवकरात लवकर सुरू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. शिवाय एमएमआरडीएच्या स्कायवॉकच्या कामामुळेच एजन्सीला स्ट्रक्चरल ऑडिटचे काम वेळेआधी पूर्ण करण्याचा दबाव आला असल्याचे कळते. या स्कायवॉकच्या कामासाठी तीन महिने एमएमआरडीएमार्फत स्कायवॉकचा काही भाग हा बंद ठेवण्यात येणार आहे. येत्या २४ जूनला हा स्कायवॉक पुन्हा नागरिकांच्या सेवेत येणार आहे. मुंबईतला पहिला स्कायवॉक म्हणून नावलौकिक असलेला स्कायवॉक एमएमआरडीएने उभारला होता. त्यानंतर या स्कायवॉकच्या देखभाल व दुरूस्तीसाठीची जबाबदारी मुंबई महापालिकेकडे देण्यात आली आहे.

First Published on: March 27, 2019 5:15 AM
Exit mobile version