बेस्टचे उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजनांसह अहवाल सादर करा; महाव्यवस्थापक चंद्रा यांचे आदेश

बेस्टचे उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजनांसह अहवाल सादर करा; महाव्यवस्थापक चंद्रा यांचे आदेश

मुंबईकरांचा प्रवास आणखीन 'बेस्ट' होणार

बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाची सूत्रे हाती घेतल्यावर लोकेश चंद्रा यांनी शनिवारी तातडीने बेस्टच्या अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत महाव्यवस्थापक चंद्रा यांनी बेस्ट उपक्रमाच्या दैनंदिन कामकाज, कार्यपद्धतीचा सखोल आढावा घेतला. तसेच बेस्ट उपक्रमाला तोट्यामधून नफ्यात आणण्यासाठी, बेस्टचे उत्पन्न वाढवण्यासाठी काय-काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याबाबचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांनी शनिवारी कुलाबा येथील त्यांच्या दालनात उपक्रमाच्या वरिष्ठ वाहतूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन बेस्टच्या वाहतूक प्रवर्तन प्रणालीविषयी सखोल माहिती जाणून घेतली.

यानंतर उपक्रमाची वाहतूक सेवा अधिकाधिक सक्षम करून जास्तीत जास्त प्रवाशांना याचा लाभ कसा करून देता येईल यावर विस्तृत चर्चा केली. त्याचबरोबर प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने, तसेच प्रवासी उत्पन्नाच्या व्यतिरिक्त अन्य प्रकारे उत्पन्नाचे स्त्रोत कसे विकसित करण्यात येऊ शकतात, याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

तसेच दुमजली बस गाड्या, इलेक्ट्रिक बस याबाबतही महाव्यवस्थापक यांनी सखोल चर्चा केली. सध्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने बेस्टला प्रवासी वाहतूक करण्यात काही अडचणी येत आहेत. त्यामुळे कोरोनाजन्य परिस्थिती पाहता भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या आणि आव्हानांना तोंड देण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना तयार करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

First Published on: June 5, 2021 11:03 PM
Exit mobile version