ओमानमधील महिलेच्या डोकेदुखीवर मुंबईत यशस्वी उपचार

ओमानमधील महिलेच्या डोकेदुखीवर मुंबईत यशस्वी उपचार

मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटल

डोकेदुखी सर्वसामान्य म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण, ही डोकेदुखी सुरुवातीला मायग्रेन आणि त्यानंतर गंभीर अशा एखाद्या आजाराचं रुप धारण करु शकते. ओमानमधील ३५ वर्षांच्या महिलेलाही गेली अनेक वर्ष असाच गंभीर आणि दुर्मिळ डोकेदुखीची समस्या होती. ज्यावर वेळीच उपचार झाले नसते तर तिला कायमचं अंधत्व आलं असतं. ओमानमधील फरियल युसुफ यांना लहानपणापासून डोकेदुखीचा त्रास होता. डोकेदुखीसह मळमळ, उलट्या, प्रकाश आणि आवाज सहन न होणं अशी लक्षणंही त्यांच्यामध्ये होते. फरियलने ओमान येथे ही उपचार घेतले. तेव्हा त्यांना थोडासा दिलासा मिळाला. पण, त्यानंतर त्यांची लक्षणं अधिकच तीव्र होऊ लागली आणि त्यात बदल झाले. यामुळे त्यांच्या दैनंदिन आयुष्यावरही परिणाम होऊ लागला.

महिलेवर यशस्वी उपचार

ऑक्टोबर २०१८ मध्ये फरियल या मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. त्यांना जाणवणारा त्रास ही मायग्रेनची लक्षणे होती. परंतु अलीकडे त्यांच्या डोकेदुखीच्या प्रकारात झालेला बदल आणि वाढलेली तीव्रता आणि वारंवारता यामुळे कवटीच्या आतील दाब वाढल्याची शक्यता दिसत होती. त्यांच्या सेरेब्रोस्पायनल फ्लुईड (प्रमस्तिष्क मेरू द्रव) चाचणी केली असता त्यांना मायग्रेनचा त्रास असल्याचं समोर आलं. त्यानुसार, फरियल यांच्यावर वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये वाढलेल्या सीएसएफवर यशस्वी उपचार करण्यात आले.

फरियल यांना सुरुवातीला होणारी डोकेदुखी मायग्रेनमुळे होत होती आणि दररोज ३ ते ४ अनलजेसिक्स घेतल्याने त्यातील गुंतागुंत वाढली होती. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या कानात आवाज येत होता, त्यामुळे त्यांना झोपही लागत नव्हती, प्रत्येक वस्तू दुहेरी दिसत होती. डोकं दुखताना दृष्टी धुसर होत होती. अलीकडे त्या दिवसाला ३-४ अॅनलजेसिक्सही घेत होत्या. त्यामुळे, त्यांना औषधांच्या अतिसेवनामुळे होणारी डोकेदुखी होऊ लागली होती.

लक्षणातील बदल, डोकेदुखीच्या प्रकारात झालेला बदल आणि वाढलेली तीव्रता, वारंवारता यामुळे कवटीच्या आतील दाब वाढल्याची शक्यता दिसत होती. त्यांच्या सेरेब्रोस्पायनल फ्लुईड (प्रमस्तिष्क मेरू द्रव – CSF) चाचणी केली. सीएसएफ प्रेश सामान्यपणे १८० मिमी असतो. मात्र, फरियल यांचा सीएसएफ प्रेश ३२० मिमी होता. अधिक तपासण्या केल्या असता त्यांना आयडिओपॅथिक इंटेक्रॅनिअल हायपरटेंशन (आयआयएच) हा विकार असल्याचं निदान झालं.

आयडिओपॅथिक इंटेक्रॅनिअल हायपरटेंशन म्हणजे काय?

ही दुर्मिळ प्रकारची डोकेदुखी असते.
दर १ लाख लोकसंख्येमागे आयआयएचचे १ ते २ रुग्ण आढळतात.
हा आजार होण्यामागचे कोणतेही कारण समजलेलं नाही.
हा आजार प्रजननक्षम वयातील महिलांमध्ये प्रामुख्याने आढळून येतो.
निदान न झाल्यास दैनंदिन आयुष्यावर परिणाम होतोच, पण वेळीच उपचार केले नाहीत तर कायमचं अंधत्व येण्याचीही शक्यता असते.
आयआयएचमध्ये ऑप्टिक डिस्कमध्ये सूज आढळून येते.

मात्र, या रुग्णामध्ये ते आढळून आलं नाही. सखोल वैद्यकीय चाचणी आणि सीएसएफच्या दाबाच्या मोजमापामुळे निदानावर शिक्कामोर्तब झालं. त्यांच्या वाढलेल्या सीएसएफवर यशस्वी उपचार करण्यात आले.

थेरप्युटिक टॅप ही शस्त्रक्रिया करून आणि औषधांनी सीएसएफचा दाब कमी करण्यात आला. तसेच रुग्णाने औषधांना प्रतिसाद दिला नाही, तर अशा प्रकरणांमध्ये शन्ट (मार्गिका तयार करणे), ऑप्टिक नर्व्ह फेनेस्ट्रेशन किंवा व्हेनस सायनस स्टेन्टिंग इत्यादी पर्याय अवलंबावे लागतात. वेळेवर उपचार केल्याने या महिलेची प्रकृती सामान्य झाली. विलंब झाला असता तर ऑप्टिक नर्व्हवर (नेत्र रक्तवाहिनी) आलेल्या दाबामुळे कायमची दृष्टी गमवावी लागली असती.  डॉ. प्रशांत मखिजा; मेंदूविकारतज्ज्ञ

अतिरिक्त सीएसएफ काढल्यावर त्या महिलेला बरे वाटू लागले. गेले ८ महिने त्या फॉलोप घेत आहेत आणि या उपचारांनंतर त्यांना अॅनलजेटिक्सची आवश्यकता भासलेली नाही. त्यांना डोकेदुखीचा त्रास झालेला नाही आणि दृष्टीसुद्धा धुसर झालेली नाही. टिनिटस (कानात घंटी वाजल्यासारखा आवाज येणं) ८०% कमी झालं आहे आणि त्या आता सुखानं झोपू शकत आहेत. त्यांनी ६ किलो वजन कमी केले आहे. त्यामुळेही त्यांचे सीएसएफ प्रेशर (दाब) कमी होण्यास मदत झाली आहे.


हेही वाचा – विक्रोळीत सापडलेल्या जखमी कोल्ह्यावर यशस्वी शस्त्रक्रिया


 

First Published on: August 21, 2019 9:17 AM
Exit mobile version