अशा घटनांमुळे महाराष्ट्राची प्रगती थांबेल; कोल्हापूर प्रकरणी अनिल परब यांची प्रतिक्रिया

अशा घटनांमुळे महाराष्ट्राची प्रगती थांबेल; कोल्हापूर प्रकरणी अनिल परब यांची प्रतिक्रिया

मुंबई : व्हॉट्सअपला औरंगजेब आणि टिपू सुलतान स्टेटस ठेवल्याप्रकरणी कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनेने आज आंदोलन केले. शांततेने आंदोलन सुरू होते, मात्र शहरातील मटण मार्केट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला. याप्रकरणी बोलताना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब म्हणाले की, अशाप्रकारे परिस्थिती बिघडत असेल तर गुंतवणूक बंद होईल आणि महाराष्ट्राची प्रगती थांबेल.

अनिल परब म्हणाले की, गेल्या दहा महिन्यांपासून आंदोलनाच्या घटना घडत आहेत आणि वारंवार घडत आहेत. अशा वातावरणामुळे महाराष्ट्राची प्रगती थांबू शकते. त्यामुळे जे गुंतवणुकदार महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करू इच्छितात, परंतु अशाप्रकारे परिस्थिती बिघडत असेल तर गुंतवणूक बंद होईल आणि महाराष्ट्राची प्रगती थांबेल. अशा घटनांमुळे लोकांचे लक्ष हटून दुसऱ्या गोष्टींकडे जात आहे. या वातावरणात जर दंगलींना थांबवायचे असेल तर विरोधी पक्ष मागे जाणार नाही तो पुढे येईल. परंतु या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष व्हायला पाहिजे आणि जो कोणी या प्रकरणी जबाबदार असेल तर त्यांच्यावर चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका अनिल परब यांनी मांडली. (Such incidents will stop the progress of Maharashtra; Anil Parab’s reaction on the Kolhapur case)

अनिल परब म्हणाले की, अशा घटनांमध्ये सूत्रधार कोण आहे हे शोधले पाहिजे. जाणूनबुजून असे केले जात आहे का याचा शोध घेतला पाहिजे. जाणूनबुजून करत असतील तर त्याची कारणं काय ती शोधली पाहिजे. यांना कोणत्या राजकीय पक्षाचा पाठिंबा आहे का हे देखील शोधले पाहिजे. यासाठी पोलिसांनी आपलं काम चोख केलं पाहिजे. कोणत्याही दबावाखाली या प्रकरणाची चौकशी होता कामा नये. आम्ही पोलिसांकडून अपेक्षा करू शकतो. कारण पोलिसांची जबाबदारी आहे की, या प्रकरणाची योग्य प्रकारे चौकशी करून ज्या लोकांचा यात हात आहे त्या सर्व दोषींवर त्यांनी सक्त कारवाई करावी.

निवडणुका लागू शकतात
निवडणुका लावण्यासाठी अशा घटना घडत असल्याचे अजित पवार यांनी विधान केले, याबाबत अनिल परब यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, शक्यता आहे, काही होऊ शकते. सध्या ज्या पद्धतीचे वातावरण आहे. सत्ताधारी निवडणुका घेणे टाळत आहे आणि त्याचबरोबर असं वातावरण खराब होत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी शक्यता असल्यामुळे आम्हाला असं वाटतं की निवडणुका लागू शकतात.

जातीय सलोखा महाराष्ट्राल परवडणारे नाही
शरद पवार यांनी नगरमध्ये औरंगजेबाचे पोस्टर दाखवले म्हणून पुण्यात आंदोलन करणे गरजेचे नसल्याचे विधान केले होते, याबाबत प्रश्न विचारला असताना अनिल परब म्हणाले की, ते मोठे नेते आहेत. त्याच्या वाक्याचा अर्थ मी सांगू शकणार नाही. तो त्यांनीच सांगावा. परंतु मला असं वाटतं की, कोणीतरी जाणूनबुजून अशा घटना वारंवार घडवू इच्छित आहे. काल एखाद्या ठिकाणी गोष्ट घडली असेल, परत ती दुसऱ्या ठिकाणी घडवून आणायची आणि त्यावरून जातीय सलोखा खराब करायचा हे काही महाराष्ट्राला परवडणारे नाही आहे, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.

First Published on: June 7, 2023 3:21 PM
Exit mobile version