उत्तनमधील सुटकेस मर्डर केसचा पोलिसांकडून २४ तासात उलगडा

उत्तनमधील सुटकेस मर्डर केसचा पोलिसांकडून २४ तासात उलगडा

उत्तन समुद्रकिनारी एका सुटकेसमध्ये मुंडके नसलेला महिलेचा मृतदेह आढळून आला होता, परंतु पोलिसांनी अवघ्या २४ तासात या खुनाचा उलगडा करीत महिलेचा पती आणि दिराला शनिवारी वसईतील नायगाव येथून अटक केली. दोघांनीही चारित्र्याच्या संशयावरून हत्या केल्याची कबुली दिली. महिलेच्या हातावर असलेल्या टॅट्यूवरून पोलिसांनी खुनाची उकल केली आहे.

उत्तन येथील पातान बंदर समुद्रकिनारी शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एका सुटकेसमध्ये मुंडके नसलेला एका महिलेचा मृतदेह सापडला होता. हत्याकांडाचे गांभीर्य ओळखून मीरा-भाईंदर परिमंडळचे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी परिमंडळातील सर्व पोलीस ठाण्यांतील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्याच्या घटनास्थळी बोलावून गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सूचना व मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने काशिमीरा व नवघर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित लांडे यांनी मृत महिलेच्या हातावरील टॅट्यूच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणातून प्राप्त माहितीच्या आधारे अनोळखी मृत महिलेची ओळख पटवली.

तपासात तिचे नाव अंजली मिंटू सिंग (२३, रा. राज अपार्टमेंट, राजावली, नायगाव पूर्व) असे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तिचा पती मिंटू रामब्रिज सिंग (३१) आणि दीर चुनचुन रामब्रिज सिंग (३५) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत दोघांनीही हत्येची कबुली दिली. सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असलेल्या मिंटू सिंगचा पत्नी अंजलीच्या चारित्र्यावर संशय होता. ही बाब त्याने कांदिवली येथे राहणारा भाऊ चुनचुन रामब्रिज सिंगला सांगितली. त्यानंतर दोघांनीही तिचा काटा काढायचा निर्णय घेतला. अंजलीची हत्या केल्यानंतर तिची ओळख पटू नये यासाठी तिच्या मृतदेहाचे दोन तुकडे करण्यात आले. एका सुटकेसमध्ये मुंडके नसलेले शरीर भरून ती बॅग उत्तन येथील पातान बंदर समुद्रात फेकण्यात आली, पण टॅट्यूने पोलिसांना थेट मारेकर्‍यांपर्यंत पोहचवले.

First Published on: June 4, 2023 5:26 AM
Exit mobile version