थोड्याच वेळात सुजय विखे पाटील भाजपात

थोड्याच वेळात सुजय विखे पाटील भाजपात

सुजय विखे पाटील आणि मुख्यमंत्री

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय भाजपात प्रवेश करणार याबाबतच्या चर्चा केल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण लवकरच सुजय विखे पाटील भाजपात प्रवेश करणार आहेत. आज, मंगळवारी सुजय विखे पाटील यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या  शासकीय निवासस्थानी असलेल्या शिवनेरीवर त्यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी १ च्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ते भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. सुजय पाटील आणि गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर महाजन यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेत सुजय पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. शिवाय त्यांना उमेदवारी द्यायची की नाही हे केंद्रीय निवड समिती निश्चित करेल, असेही महाजन यावेळी म्हणाले.

नगरमधून उमेदवारीची आशा 

सुजय विखे पाटील यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. मात्र राष्ट्रवादी ही जागा काँग्रेसला सोडायला तयार नाही. त्यामुळे सुजय विखे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. आज या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळाला असून सुजय विखे पाटील यांनी गिरीश महाजन यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवावी, अशी चर्चा मध्यंतरी सुरु झाली होती. मात्र सुजय राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्यास इच्छूक नाहीत. तसेच राधाकृष्ण विखे पाटील आणि शरद पवार यांच्यात खासगीत बैठक झाल्या. मात्र पवारांनी अशा बैठका झाल्याच नसल्याचे जाहीर सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काय भूमिका घेईल? याचा थांगपत्ता विखेंना लागत नाही. म्हणूनच सुजय यांना भाजपचा पर्याय उरताना दिसत आहे.

First Published on: March 12, 2019 12:35 PM
Exit mobile version