वसईत रविवारी साहित्य कला महोत्सव

वसईत रविवारी साहित्य कला महोत्सव

सहयोग संस्थेतर्फे आयोजित केला जाणारा 9 वा वसई साहित्य कला महोत्सव येत्या रविवारी भुईगाव येथील सहयोग सेंटरमध्ये होणार आहे. यावेळी 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख उपस्थित राहणार आहेत. 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता बुद्धवनापासून ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. विनायकदादा पाटील, प्रा. अविनाश कोल्हे, प्रकाश भातंब्रेकर, डॉ. शशिकांत लोखंडे, सुदेश हिंगलासपूरकर, डॉ. सोमनाथ विभुते, फादर अ‍ॅण्ड्रयू रॉड्रिग्ज प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

ख्यातनाम चित्रकार अब्दुल अजीज रायबा यांच्या निवडक चित्रांच्या प्रदर्शनासोबत प्रसिद्ध चित्रकार फिलीप डिमेलो याचे स्वतःला शोधताना या मालिकेतील चित्रप्रदर्शन, तरुण चित्रकार रॉजर सेरेजो यांची चित्रे व शिल्पकार प्रदीप कांबळे यांच्या शिल्पाकृतीच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

संमेलनस्थळी पुस्तक प्रदर्शनाबरोबरच दुर्मिख वृक्ष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने कवी सायमन मार्टीन यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन यावेळी होईल. प्रा. अंजली दशपुत्रे, प्रा. उत्तम भगत, योगिनी राऊळ, विजय परेरा आणि विलास पगार निवडक कवितांचे यावेळी सादरीकरण करतील.

सहयोगतर्फे दिला जाणारा स्व. सिस्टर मार्टीना मार्टीन स्मृती पुरस्कार जव्हार वाळवंडा येथील माऊल शिक्षण प्रसारक संस्थेला जाहीर झालेला आहे. एक लाख रुपये रोख, स्मृती चिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सहयोग गुणवंत सन्मान सोहळ्यामध्ये नाट्यकर्मी विलास पगार, आंतरधर्मीय सुसंवादासाठी मुर्तजा इलेक्ट्रीकवाला, पार्श्वगायिका शकुंतला जाधव, गझलकार मोईनद्दीन शेख आणि तबलावादक डायगो लोपीस यांचा गौरव करण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात वसई येथील रंगवेध, अमल कला सेवाभावी नाट्यमंडळ व संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालय कला विभाग याच्याबरोबरच प्रसिद्ध गायक ब्लेस डिमेलो, मॉनिका तुस्कानो, विजय मच्याडो, सुमेधा शिंगाडे, संगीत, नृत्य, नाट्य सादर करणार आहेत.

First Published on: October 4, 2019 1:03 AM
Exit mobile version