चित्रनगरीतील उपोषणकर्त्यांची मुस्कटदाबी !

चित्रनगरीतील उपोषणकर्त्यांची मुस्कटदाबी !

चित्रनगरी (प्रातिनिधीक चित्र)

आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करणाऱ्या चित्रनगरीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रशासनाकडून मुस्कटदाबी करण्यात येत असून, एका सुरक्षा अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. हा अधिकारी या अन्यायाविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे.

‘महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा’च्या अखत्यारित असलेल्या चित्रनगरीत सरकारी सेवेतील निवृत्त अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत कंत्राटी पध्दतीवर रुजू करुन घेणे, गेल्या अनेक वर्षांत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणे, कर्मचाऱ्यांना दैनिक आणि इतरही भत्ते देणे, मंडळाच्या सुरक्षा रक्षकांच्या पगारावर केवळ १२ लाखांचा खर्च होत असताना त्यांच्या जागी आणलेले महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांवर तब्बल २६ लाखांचा करणे, अशा अनेक मागण्या घेवून चित्रनगरीतील चार कामगारांनी गेल्या ५ जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याऐवजी एक उपोषणकर्ता आणि चित्रनगरीतील सुरक्षा अधिकारी शिरीष सावंत यांना काल शिस्तभंगाचे निमित्त करत निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे येथील कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे.

चित्रनगरीतील कामगारांचे उपोषण सुरू

चित्रनगरीच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयाजवळ शिरीष सावंत, विजय कांबळे, अनिल जाधव तसेच शंकर शिंदे या चित्रनगरीतील विविध खात्यांत काम करणाऱ्या कामगारांनी उपोषण सुरु केले आहे. कालच्या तिसऱ्या दिवसानंतरही चित्रनगरी अथवा महामंडळाच्या एकाही अधिकाऱ्याने तेथे भेट दिली नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. तर चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज यांनी उपोषणकर्त्यांशी साधी चर्चाही न करता एक उपोषणकर्ते शिरीष सावंत यांना निलंबित केल्याचे पत्र काल सावंत यांच्या हाती दिले. चित्रनगरी महामंडळाने गेल्या ९ मे रोजी मुख्य सुरक्षा अधिकारी कंत्राटी पध्दतीवर नियुक्त करण्यासाठी जाहिरात देत या जागी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक जाधव यांची नियुक्ती केली होती. याच जागी गेल्या १५ ते १६ वर्षांपासून काम करणारे सहाय्यक सुरक्षा अधिकारी सावंत यांना पदोन्नती न देता त्यांच्यावर अन्याय केल्याच्या भावनेतून सावंत यांनी उपोषण सुरु केले होते.

उपोषणकर्त्या कामगारांच्या मागण्या चुकीच्या आहेत. त्यामुळे मागण्या मान्य करता येत नाहीत. त्या आम्ही सरकारकडे पाठवल्या आहेत. इतर बाबींबाबत आपण काही सांगू शकत नाही
– निवृत्ती मराळे, प्रशासकीय अधिकारी, चित्रनगरी

सावंत यांना दिलेल्या निलंबन पत्रात त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत असल्याचे नमुद करत पत्र क्र.शिसानि-२०१८/प्रक्र.१४७/प्रशा-१/८५९ नुसार निलंबित केले आहे. याच पत्रात सावंत यांच्यावर नवीन अधिकाऱ्याला ते बसत असलेले कार्यालय देत नसल्याचेही कारण देण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी आपला मोबाईल उचलला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.

First Published on: June 8, 2018 8:57 AM
Exit mobile version