मुंबईत लेप्टोचे तीन तर स्वाईन फ्लूचा एक बळी

मुंबईत लेप्टोचे तीन तर स्वाईन फ्लूचा एक बळी

मुंबईत लेप्टोचे तीन तर स्वाईन फ्लूचा एक मृत्यू

मुंबईत पावसाचा सध्या वाढता जोर पाहायला मिळत आहे. यासोबतच आजारांचा ही जोर वाढलेला आहे. मुंबईत गेल्या महिन्यापासून लेप्टो आणि स्वाईन फ्लूने थैमान घातलं आहे. आतापर्यंत मुंबईत लेप्टोमुळे तिघांचा जीव गेला आहे. तर, स्वाईन फ्लूमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. ऑगस्ट महिन्यातील पालिकेच्या आरोग्य विभागातून ही माहिती देण्यात आली आहे. तसंच, आरोग्य विभागाच्या तपासणीत ऑगस्ट महिन्यात डेंग्यू सदृष्य २ हजार ३१७ जण आढळून आले असल्याची माहिती देण्यात आली. पण, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत ही रुग्णसंख्या कमी असल्याचे सांगण्यात आले.

ऑगस्ट २०१८ च्या तुलनेत ऑगस्ट २०१९ मध्ये डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, गॅस्ट्रो, हेपेटायटिस या रुग्णांची संख्या कमी आहे. पण, लेप्टोच्या बळींची संख्या सारखीच आहे. के पश्चिम वॉर्डमधील ५८ वर्षीय पुरुष आणि २९ वर्षीय महिलेचा तर पी दक्षिण वॉर्डमधील ४१ वर्षीय व्यक्तीचा लेप्टोने मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीत म्हटले आहे. तर, के पश्चिम वॉर्डमधील ६४ वर्षीय इसमाचा स्वाईन फ्लूमुळे खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले असून स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक काळजी घेण्यात येत असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

तसंच, एकीकडे लेप्टो आणि स्वाईन फ्लूची भीती आहे, तर दुसरीकडे डेंग्यूच्या रुग्णांचं प्रमाण मात्र त्यातल्या त्यात कमी आहे. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या घटली आहे, याशिवाय डेंग्यूमुळे या महिन्यात एकाचा मृत्यू झालेला नाही.

ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या पूरस्थितीमुळे लेप्टोला प्रतिबंधक काळजी घेण्यात आली आहे. यातून १ लाख ९२ हजार १५२ जणांची तपासणी करण्यात आली. यात ३ हजार ७८२ मुले तर १८१ गरोदर महिला होत्या. त्याच दरम्यान ३ हजार २३३ जणांना डॉक्सीसीलीन गोळ्यांचे वाटप करण्यात आल्याची माहितीही अहवालात देण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्यातील रुग्णसंख्या आणि मृत्यू

                    २०१८                               २०१९
आजार        रुग्ण      मृत्यू                    रुग्ण      मृत्यू
मलेरिया      ८५३        १                      ७६७     ०
लेप्टो           ४६        ३                        ४५       ३
एच१एन१     ०          ०                        ३६        १
गॅस्ट्रो          ६४५      ०                        ६२३      ०
कावीळ       १३५       ०                        १४७      ०
डेंग्यू           १५३       ३                        १३४      ०

लेप्टो आणि स्वाईन फ्लू नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन आपल्याकडून पुरेपूर प्रयत्न करत आहे. तरी नागरिकांनी देखील काळजी घ्यावी, असं आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे.

तुम्ही पाण्यातून गेला असाल आणि त्यानंतर तुम्हाला ताप आला असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. अति ताप, डोकेदुखी, डोळे लाल होणे, स्नायूंमध्ये वेदना अशी लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जा, स्वतच औषधोपचार करू नका. कचऱ्याच्या ठिकाणी उंदीर आणि भटक्या कुत्र्यांचा आवर असतो, त्यांच्यामुळेच लेप्टोची लागण होते. त्यामुळे आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा, असा सल्ला पालिकेनं नागरिकांना दिली आहे.

First Published on: September 3, 2019 10:17 AM
Exit mobile version