पाठीवरच्या बॅगा पायात घ्या!

पाठीवरच्या बॅगा पायात घ्या!

आपल्या जेवणाच्या डब्यापासून ते पाणी, लॅपटॉप अशा कोणत्याही वस्तू तुम्ही स्वतःसोबत बॅगेत ठेवत असाल तर सगळ्या वस्तूंसह ही बॅग तुम्हाला पायात ठेवावी लागणार आहे. मेट्रो १ मधील दिवसेंदिवस वाढणारी गर्दी पाहता बँगांमुळे अडणारी जागा वाचवण्यासाठी मेट्रोने बॅगा पायाशी ठेवा, असे आवाहन करणारी मोहीम राबवण्याचे ठरविले आहे. बॅगांमुळे इतर प्रवाशांची गैरसोय टाळतानाच मेट्रोच्या डब्यातली जागा वाढेल, असा विश्वास मेट्रोच्या अधिकार्‍यांना वाटतो.

घाटकोपर-अंधेरी वर्सोवा या मुंबई मेट्रो १ च्या मार्गावर अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस तसेच औद्योगिक वसाहतीच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी मेट्रोच्या मार्गाचा वापर करतात. मोठ्या बॅगेजला मेट्रो प्रवासावर बंधने आहेत. पण आता खांद्यावरील तसेच पाठीवरील बॅगही मेट्रोमध्ये जागेची चणचण निर्माण करत आहे, असे मेट्रो व्यवस्थापनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पिक अवर्समध्ये प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी तसेच मेट्रोमध्ये अधिक प्रवाशांना प्रवास करता या उद्देशाने उभ्या प्रवाशांना आपली बॅग पायात ठेवण्याचे आवाहन करणारी मोहीम मेट्रोकडून येत्या दिवसांमध्ये सुरू होणार आहे.

मेट्रोकडून येत्या दिवसांमध्ये प्रवाशांसाठी जागा वाढवण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील यासाठी एक आढावा घेण्यात येणार आहे. सध्या अनेक स्टेशनवर आम्ही अशा आशयाच्या उद्घोषणा करत आहोत. तसेच काही ठिकाणी साईन बोर्डही लावण्यात आले असल्याची माहिती मेट्रोतील सुत्रांनी दिली. बॅगांमुळे मेट्रो डब्यातील स्पेस ब्लॉक होते. त्यामुळेच आम्ही एक आवाहन म्हणून प्रवाशांच्या सोयीसाठी ही मोहीम जाहीर करणार आहोत, अशी मेट्रोची भूमिका आहे. मुंबईसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात प्रवासादरम्यान लोकांनी सहाय्य करणे, समजून घेणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग ही मोहीम असेल, असे मेट्रोतील सूत्रांनी सांगितले.

First Published on: September 15, 2019 6:06 AM
Exit mobile version