शोध, आक्रोश आणि दिलासा…!

शोध, आक्रोश आणि दिलासा…!

ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणचं नाव तळीये वरचीवाडी. त्या वाडीत ३५ घरं असल्याचं आम्हाला सांगितलं. परंतु ज्यावेळी आम्ही पाहिलं तिथे केवळ तीन घरं आणि तीदेखील अक्षरश: उद्ध्वस्त झालेली दिसली. बचावकार्य सुरू होतं. नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. तिथे केवळ मदतकार्य, अ‍ॅम्ब्युलन्सचा आवाज आणि नातेवाईकांचा आक्रोश कानावर पडत होता. दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी पोहोचले.त्यांनी मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा केली आणि पुनर्वसन करू, असे आश्वासन देत ते मार्गस्थ झाले.

आम्ही कुटुंब गमावलं अशा पीडित व्यक्तीशी संवाद साधला आणि त्यांनी जे काही सांगितलं त्यानं छातीत धस्स झालं…त्या व्यक्तीने आईवडील, पत्नी आणि मुलांना गमावलं होतं. मग त्यांना तुम्ही यातून कसे बचावलात असा प्रश्न केला असता त्यांनी ‘मी दुबईला होतो असे सांगितले’. मला इथे काय घडलं याची थोडीशी माहिती समजली. मात्र, मी जास्त गंभीरपणे ती गोष्ट घेतली नाही, मला वाटलं छोटसं काहीतरी घडलं असावं. मात्र, जेव्हा संपूर्ण बातमी समजली तेव्हा..असं सांगत तो पुन्हा हमसून रडू लागला.

खरं तर एखाद्या व्यक्तीने संपूर्ण कुटुंब गमावलं असताना पुन्हा प्रश्न विचारू की नको असा मनात विचार आला, अखेर हिंमत करून आता पुढे कसं जगणार? असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी हुंदका देत : ‘हिंमत करून जगावं लागेल; पण सरकारने आम्हाला मदत करावी. आमचं पुनर्वसन करावं’. मात्र, काही सेकंदात हुंदके देत अखेर त्याने अश्रूंचा बांध फोडला…हुंदके देत माझ्या आईचा मृतदेह अजून सापडला नाही आहे असं म्हणाला, शेवटचं तरी आम्हाला पाहू द्या अशी आर्जव करत टाहो फोडू लागला. पुढे काय बोलावं काही सुचेना…

पुढे हिंमत करत मी अजून एका पीडित व्यक्तीशी संवाद साधला. त्यांनी जे सांगितलं ते खूपच धक्कादायक होतं. त्या व्यक्तीचं संपूर्ण कुटुंब या दुर्घटनेत संपलं, केवळ ती एक व्यक्ती वाचली. मी तरी का वाचलो असा टाहो तो फोडत होता…
एकीकडे नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता तर दुसरीकडे एनडीआरएफचं काम सुरू होतं. १, २….असे करत तब्बल ५ मृतदेह ओळख पटवण्यासाठी एका रांगेत ठेवण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा सुरू झाला तो काळीज चिरणारा आक्रोश…माझी आई…माझा बाबा…माझा दादा…त्या निपचित पडलेल्या मृतदेहांना उठवण्याचा केविलवाणा प्रयत्न ते नातेवाईक करत होते…त्यांना माहीत होतं की हे पुन्हा येणार नाहीत; पण शेवटचा प्रयत्न करत असावेत बहुदा…

मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार सर्व येऊन भेट देत आश्वासन देऊन गेले. पण पुढे काय? ज्यांनी आपले नातेवाईक गमावले त्यांची आता गर्दी जमू लागली. या सर्वांचं करायचं काय? यांना धीर द्यायचा तरी कसा, असा प्रश्न तिथल्या आजूबाजूच्या लोकांना पडला. काय करायचं, कसं करायचं कुजबुज सुरू होती. खरंतर आजूबाजूची जी घरे, वाड्या या दुर्घटनेतून बचावल्या आहेत त्यांना धोका असल्याचं स्पष्ट दिसत होतं. कारण त्या वस्त्या डोंगराच्या पायथ्याशी आहेत. आजूबाजूने उंचच उंच डोंगर…कधीही भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या लोकांचं चांगल्या ठिकाणी पुनर्वसन करावं एवढीच आशा…

डोंगराखालच्या गावांचे पुनर्वसन

राज्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या संख्येने घडत आहेत. याचा विचार करता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डोंगराळ भागात जी गावे आहेत, अशा गावांचे पुनर्वसन करण्याची आता वेळ आली आहे. त्यासाठीचा लवकरच मोठा निर्णय घेतला जाईल, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दरडग्रस्त तळीये गावाच्या पाहणीनंतर ठाकरे यांनी शनिवारी ही घोषणा केली. परिसराच्या पाहणीनंतर ठाकरे यांनी मृतांच्या आणि बेपत्ता नातेवाईकांनीही आपली कैफीयत मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.

‘आमचे नातलग, कुटुंबातील व्यक्ती आम्हाला अजून सापडलेल्या नाहीत, त्यामुळे आम्हाला या कठीण प्रसंगातून मदत मिळावी’, अशीही मागणी करण्यात आली. यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘सरकारी पातळीवर सर्वांना योग्य ती मदत देण्यात येईल. तुम्ही काळजी करू नका’. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे तसेच जखमींची सगळी ओळखपत्रे तसेच शासकीय मदत मिळवून देण्याचेही यावेळी आश्वासन दिले. ‘कागदपत्रांचा आता विचार करू नका ते सरकारचे काम आहे. तुम्ही या कठीण प्रसंगी स्वतःला सावरा, बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा’, असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

तळीये गावात बचाव आणि मदतकार्यासाठी आर्मी, नौदल, एअऱफोर्स अशा सगळ्या यंत्रणांची मदत आपण महाडच्या तळीये गावासाठी घेतली आहे. ‘संपूर्ण गावावर आलेले संकटच अतिशय अवघड होते, आम्ही भरपूर प्रयत्न केले आणि करतोय; पण तुमच्यावर स्वतःचे कुटुंबीय गमावल्याने आलेली परिस्थिती खरंच अवघड आहे. पण सरकार तुमच्या सोबत आहे’, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी तळीयेच्या उपस्थित ग्रामस्थांना आधार दिला.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील ९ जिल्हे अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झाले आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीची मदत म्हणून २ कोटी रुपये देण्यात आले असून पाऊस आणि पाणी ओसरल्याने मदत कार्यास वेग देण्यात आला आहे.

९० हजार नागरिक सुरक्षित स्थळी ,अतिवृष्टीचा ८९० गावांना तडाखा

तळीये आणि पोलादपूर तालुक्यातील दोन दरड दुर्घटनात आतापर्यंत ६० जण मृत्युमुखी झाल्याचे आढळून आले असून तळीयेत ढिगार्‍याखाली आणखी काही ग्रामस्थ गाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यांचा शोध एनडीआरएफ, टीडीआरएफ आसपासच्या ग्रामस्थांच्या मदतीने घेत आहे. अतिवृष्टीमुळे राज्यात दरडी कोसळत असून सातार्‍यातील पाटण तालुक्यातील मीरगावात दरड कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

अतिवृष्टीनंतर निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरडी कोसळत असल्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील बाधित गावातील ९० हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पुराचा ८९० गावांना तडाखा बसला असून या आपत्तीत आतापर्यंत ११० जणांचा बळी गेला असून ५६ व्यक्तींचा अजून ठावठिकाणा लागलेला नाही.

सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील मीरगावात दरड कोसळली होती. त्यामुळे घरे जमीनदोस्त झाली. गावातल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविले असता तरी ढिगार्‍याखाली अडकलेल्या लोकांना मीरगावात जेसीबीसारखे मशिनरी किंवा अन्य कोणतीच यंत्रणा आली नसल्यामुळे काढण्यात यश आले नाही, शिवाय कोसळणारा जोरदार पाऊस सुरू होता. शनिवारी ढिगार्‍याखाली अडकलेल्या दहा जणांचे मृतदेह काढण्यात आले.

तळीये दरडग्रस्त गावांच्या यादीमध्ये नव्हते, तरीही गेल्या ६ दिवसांपासून स्थानिक प्रशासनातर्फे रेड अलर्ट देण्यात येत होता. मात्र, नागरिक आपल्या घरात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळी उशिरा तळीयेत दरड कोसळून मातीच्या ढिगार्‍याखाली ८० जण गाडले गेले. आतापर्यंत ४९ जणांचे मृतदेह मिळाले आहेत.

-गिरीश कांबळे/ निलेश पवार 

First Published on: July 25, 2021 5:45 AM
Exit mobile version