तळोजा कारागृहात कायद्याचे रक्षकच बनले भक्षक

तळोजा कारागृहात कायद्याचे रक्षकच बनले भक्षक

taloja jail

खूप वेळ झाला तरी फोन व्यस्तच लागत असल्याने त्याचे नेमके कारण शोधण्यासाठी गेलेल्या तळोजा कारागृह अधीक्षक सदानंद गायकवाड यांनी पोलीस कर्मचारी मधुकर कांबळे यांना रागाच्या भरात शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर कांबळे यांनी मुंबई विभागाचे उपमहानिरीक्षक आणि खारघर पोलिसांकडे यासंदर्भात मंगळवारी तक्रार दाखल केली असून मारहाण झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहेत.

मंगळवारी पहाटे तळोजा कारागृहातील हवालदार मधुकर कांबळे कैद्यांच्या स्वयंपाकगृहात कर्तव्यावर होते. याच दरम्यान पहाटे २ च्या सुमारास कारागृहाच्या नियंत्रण कक्षात त्यांच्या एका नातेवाईकाचा फोन आला. ते नातेवाईकाशी बोलत असताना तळोजा कारागृह अधीक्षक सदानंद गायकवाड हे नियंत्रण कक्षात बाहेरून फोन करत होते. पण, बराच वेळ फोन व्यस्त येत असल्याने गायकवाड यांचा पोलीस कर्मचारी कांबळेंशी वाद झाला. फोनवरून झालेल्या वादानंतर थोड्या वेळाने गायकवाड हे नाईट राउंडसाठी कारागृहात गेले. त्यावेळी सदानंद गायकवाड यांनी मधुकर कांबळे यांना रागाच्या भरात शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. या प्रकारानंतर संतप्त झालेले कांबळे यांनी मंगळवारी सकाळी मुंबईमध्ये कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांच्या सुचनेनुसार कांबळे यांनी खारघर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे. बुधवारी पोलीस अधिकार्‍यांच्या एका पथकाने कारागृहात या प्रकरणाची चौकशी केली असून मारहाण झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत. मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सदानंद गायकवाड यांनी सांगितले आहे.

पोलीस कर्मचारी मधुकर कांबळे हे कर्तव्यावर असताना अनेक वेळा फोनवर बोलत असायचे. त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांची वागणुकही चुकीची असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा मी त्यांना दिला. निलंबनाची तयारी सुरु केली असता कांबळे हे सैरभेर झाले आणि त्यांनी माझ्याविरोधात डाव रचला. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. चौकशीसाठी मी तयार असून सर्व पुरावे मी पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच खरा प्रकार समोर येईल.
-सदानंद गायकवाड , अधीक्षक, तळोजा कारागृह

First Published on: September 7, 2018 4:30 AM
Exit mobile version