TB रूग्णाने डॉक्टरांचे मानले आभार

TB रूग्णाने डॉक्टरांचे मानले आभार

अंशिका विश्वकर्मा आणि तिची आई

डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीची प्रकरणं खरंतर नवीन नाहीत. त्यासाठी डॉक्टरांनी रुग्णांशी कसं वागावं ? यासाठीचे धडे देखील दिले जातात. पण, एका ११ वर्षीय मुलीने आपल्याला मरणाच्या दारातून परत आणल्यामुळे डॉक्टरांचे आभार मानले आहेत. महापालिका किंवा सरकारी रुग्णालय म्हटलं की लोक नाकं मुरडतच जातात. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने याठिकाणी उपचार घेण्यावाचून पर्याय नसतो. एकदा रुग्ण बरा झाला आणि घरी पसरतला की तो रुग्णालय किंवा उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे वळूनही पाहत नाही. पण, मृत्यूच्या दारातून खेचून परत आणलेल्या एका मुलीनं नव्याने आयुष्य दिल्याबद्दल डॉक्टरांचे आभार मानत त्यांच्यासाठी एक पत्र लिहिलं आहे.

हे दिवस आपल्या आयुष्यातील शेवटचे दिवस असतील असा विचार अंशिका विश्वकर्मा या रूग्णाला आला होता. पण, आज पुन्हा एकदा हिंमतीने उभी राहिली आहे. कांदिवलीत राहणारी ११ वर्षांच्या अंशिकाला फुफ्फुसाचा टीबी असल्याचं निदान झालं होतं. तिचं एक फुप्फुस पूर्णपणे खराब होऊन त्यात पू झाला होता. लहानपणापासून कुठलाही आजार नसलेल्या अंशिकाला अचानक ताप येऊ लागल्याने स्थानिक डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार सुरू होते. औषधोपचारानंतरही ताप कमी होत नसल्याने एका खासगी हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आलं. याठिकाणच्या डॉक्टरांनी पालकांना मुलगी फार दिवस जगू शकत नाही, असं सांगितलं. त्यामुळे काही नातेवाईकांच्या सांगण्यानुसार, शिवडीच्या टीबी रुग्णालयात या मुलीला दाखल केलं. याठिकाणी वैद्यकीय चाचण्या केल्यावर १७ जानेवारी २०१८ मध्ये तिला फुफ्फुसाचा टीबी असल्याचं निदान झालं. या आजारामुळे तिचं वजन २१ किलो झालं होतं. तिला सर्वच गोष्टी करताना त्रास होत होता. मुलीची बिघडलेली प्रकृती पाहून आई-वडिलांनी सुद्धा तिच्या जगण्याची आशा सोडून दिली होती. पण, ती हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर तिच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया केली गेली आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळेच मुलीला नव्याने जीवदान मिळाले.

आपल्यावर शिवडी टीबी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी उपचार करुन जीवदान दिलं. या भावनेतून अंशिकाने आपल्या आईसह सोमवारी सकाळी १० वाजता थेट शिवडी येथील टीबी रुग्णालयाला भेट दिली. अंशिकावर उपचार करणाऱ्या डॉ. अमर पवार यांना स्वतः लिहिलेले पत्र दिले. या पत्रात अंशिकाने “रुग्णालयातील पहिला दिवस माझ्यासाठी खूपच अवघड होता. मी जगेन याची आशा सोडून दिली होती. पण, डॉक्टरांनी मला नवीन आयुष्य दिलंय. त्यांच्या प्रयत्नांमुळे मी पुन्हा जगायला सुरूवात केली.” अशा भावना व्यक्त केल्या.

याविषयी टीबी रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर पवार यांनी सांगितलं की, ‘‘अंशिका आमच्याकडे आली तेव्हा तिची प्रकृती खूपच खालावलेली होती. तिला चालताही येत नव्हतं. वैद्यकीय चाचणीत तिला फुफ्फुसाचा टीबी असल्याचं निदान झालं. फुफ्फुसात पू आणि हवा भरली होती. यावर शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय होता. पण मुलीची प्रकृती पाहता शस्त्रक्रिया करणं जीवावर बेतू शकलं असतं. त्यामुळे दोन महिने तिच्या आहारावर लक्ष ठेवण्यात आलं. वजन वाढल्यानंतर मार्चमध्ये विन्डो सर्जरी करून फुफ्फुसातील पू काढण्यात आला. एक महिना तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून औषधोपचार बंद करण्यात आले आहेत.’’

अंशिकाची आई सुमन विश्वकर्मा यांनी सांगितलं की, ‘‘मुलगी जगेल ही आशाच आम्ही सोडून दिली होती. पण, टीबी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे माझ्या मुलीला नव्यानं आयुष्य मिळालं. आता तिची प्रकृती उत्तम असून शाळेत जाते. मुलांना डान्स देखील शिकवते.’’

First Published on: January 2, 2019 7:00 AM
Exit mobile version