गांधी जयंतीबाबत शिक्षण विभागात समन्वयाचा अभाव

गांधी जयंतीबाबत शिक्षण विभागात समन्वयाचा अभाव

गांधी

2 ऑक्टोबरला असलेल्या गांधी जयंतीनिमित्त राबवण्यात येणार्‍या कार्यक्रमासंदर्भातील शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये समन्वय नसल्याचे उघडकीस आले आहे. बृहन्मुंबई पश्चिम विभागाने विद्या प्राधिकरणाकडून आलेले कार्यक्रम राबवण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. तर दक्षिण विभाग व मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून काढलेल्या परिपत्रकात तंबाखूमुक्ती व ई-सिगारेटविरोधात शपथ घेण्याचे कार्यक्रम घेण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यालयामध्ये गांधी जयंतीच्या कार्यक्रमाबाबत समन्वय नसल्याचे समोर आले आहे.

गांधी जयंतीनिमित्त मुख्याध्यापकांनी शाळांमधील सर्व सहकार्‍यांची सभा घेऊन शिक्षणाबाबत चर्चा करणे, स्थानिक कारागिर, दुकानदार यांचा सत्कार करणे, स्वच्छ परिसर उपक्रमाचे आयोजन करणे, सायकल, कुकर व मिक्सर या साहित्याच्या वापराबाबत देखभालाचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, स्वयंपाक घरातील कामांमध्ये सहभागी होण्याबाबत मार्गदर्शन करणे अशा विविध कार्यक्रमाची यादी राज्य सरकारच्या विद्या प्राधिकरणाकडून शिक्षण निरीक्षकांना पाठवलेली आहे. मात्र मुंबईतील बृहन्मुंबई पश्चिम विभाग वगळता दक्षिण विभाग व पालिकेच्या शिक्षण विभागाने या कार्यक्रमांचा अंतर्भावच गांधी जयंतीच्या कार्यक्रमात केलेला नाही.

गांधी जयंतीच्या कार्यक्रमाबाबत विद्या प्राधिकरणाकडून पाठवण्यात आलेले परिपत्रक हे एक दिवस अगोदर शाळांना मिळाले आहे. बहुतांश मुख्याध्यापक व शिक्षण हे निवडणुकीच्या प्रशिक्षणामध्ये व्यस्त असल्याने व एक दिवसात कार्यक्रमाची तयारी कशी करायची असा प्रश्न शिक्षक व मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्याध्यापक निवडणूक प्रशिक्षणात व्यस्त

गांधी जयंतीनिमित्त शाळांना कार्यक्रम राबवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले असले तरी बहुतांश मुख्याध्यापक व शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षण लावण्यात आले आहे. त्यामुळे बहुतेक शिक्षक व मुख्याध्यापक हे निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने गांधी जयंतीचे कार्यक्रम कसे राबवण्यात येणार असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

महापुरुषांच्या सुट्ट्या नावापुरत्याच

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पंडित जवाहरलाल नेहरू या महापुरुषांच्या सुट्ट्या राज्य सरकारकडून दरवर्षी जाहीर करण्यात येतात. परंतु, प्रत्यक्षात त्या दिवशी शिक्षण विभागाकडून शाळांमध्ये विविध कार्यक्रम करण्याचे परिपत्रक काढण्यात येते. त्यामुळे या सुट्ट्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठी नावापुरत्याच असल्याचे मत काही शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

First Published on: October 2, 2019 5:25 AM
Exit mobile version