शिक्षकांना मुंबईबाहेर समायोजनाची सक्ती नको

शिक्षकांना मुंबईबाहेर समायोजनाची सक्ती नको

स्वेच्छेने मुंबई बाहेर जाण्याची ज्या अतिरिक्त शिक्षकांची तयारी आहे त्यांना मुभा आहे, मात्र सरसकट शिक्षकांना समायोजनाची सक्ती न करता जेथे शिक्षकांना सहज जाणे शक्य आहे अशा ठिकाणीच समायोजन करावे, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली. अतिरिक्त शिक्षकांच्या संदर्भात मंगळवारी मंत्रालयात एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत शालेय शिक्षणमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी आढावा घेत संघटना तसेच अधिकार्‍यांशी चर्चा केली. या दरम्यान शिक्षक संघटनांनी आपले म्हणणे मांडले.

तीन वर्ष अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली होती. समायोजनाची प्रक्रिया राबविण्यापूर्वी सर्वच शाळांकडून अतिरिक्त शिक्षक, आरक्षण, विषय, पटसंख्या आदी माहिती मागविली होती. परंतु तरीदेखील काही तांत्रिक कारणांमुळे हे समायोजन पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आजही राज्यभरात अनेक शिक्षक अतिरिक्त आहेत. चार वर्षांत जे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यांच्या समायोजनांची कार्यवाही व जागा नसल्याचे कारण पुढे करत अशा शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिलेली आहेत. या शिक्षकांनी आता मुंबईबाहेर स्वेच्छेने समायोजित करण्याची मागणी केली होती. त्या मागणीची दखल शालेय शिक्षण विभागाने घेतल्याची माहिती शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली.

मुंबईत 850 तर एकूण विभागात 1035 शिक्षक अतिरिक्त आहेत. रिक्त जागा व वाढीव पदे यांची संख्या फक्त 235 पर्यंत आहेत, या सर्व शिक्षकांचे समायोजन लगेच होणार नाहीत, परंतु जशी जशी पदे रिक्त होतील तसे रिक्त जागांवर समायोजन होईल, परंतु कोणाचाही पगार बंद होणार नाही, अशी माहिती संघटनेने यावेळी दिली. शिक्षक आमदार तसेच शिक्षक परिषदेसह शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

First Published on: August 22, 2019 1:31 AM
Exit mobile version