कृतिआराखड्यामुळे सराव परीक्षेची शिक्षकांना चिंता

कृतिआराखड्यामुळे सराव परीक्षेची शिक्षकांना चिंता

अभ्यासक्रम बदलल्यानंतर त्यासंदर्भात शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. परंतु लॉकडाऊनमुळे यंदा हे प्रशिक्षण शक्य झाले नाही. तसेच यंदा बारावीला प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका दिल्या जाणार होत्या. मात्र बालभारतीकडून अद्यापही त्या प्रसिद्ध झाल्या नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची सराव परीक्षा कशी घ्यायची असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.

इयत्ता बारावीचा अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून बदलण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमामध्ये कृतिशील शिक्षणाला वाव देण्यात आला आहे. अभ्यासक्रम बदलानंतर शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. मात्र यंदा मार्चपासून सुरू झालेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिक्षकांना प्रशिक्षण देणे शक्य झाले नाही. याचा फटका शिक्षकांना ऑनलाईन शिकवणीमध्ये बसत आहे. शिक्षकांनी आपल्या विषय समुहाच्या माध्यमातून अध्ययन पद्धती चर्चा करून त्याप्रमाणे शिकवण्यास सुरुवात केली आहे. नव्या अभ्यासक्रमासाठी यंदा प्रश्नपत्रिकेऐवजी शिक्षकांना कृतिपत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या मुख्य विषयांच्या कृतिपत्रिकांचा आराखडा अद्याप बालभारतीकडून प्रसिद्ध केलेला नाही. कृतिपत्रिके अभावी भाषा विषयाची सराव परीक्षा नेमकी कशी घ्यायची याबाबत शिक्षकांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. बालभारतीने याबाबत तातडीने कार्यवाही करून कृतिपत्रिकाचा आराखडा उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेणे सोपे होईल असे मत भाषा विषय शिक्षकांनी व्यक्त केले.

First Published on: October 1, 2020 4:39 PM
Exit mobile version