मूल होत नाही म्हणून केलं चिमुरडीचं अपहरण

मूल होत नाही म्हणून केलं चिमुरडीचं अपहरण

प्रातिनीधीक फोटो

तीन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाच्या गुन्ह्यांत दोन महिलांना निर्मलनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने कुठलाही पुरावा नसताना शिताफीने अटक केली. मीरा सुनिल काळे आणि मीना धर्मा चव्हाण अशी या दोघांची नावं आहेत. या दोघीकडून अपहरण झालेल्या मुलीची सुटका करुन तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. मीनाला मूल होत नसल्याने तिच्या वहिनीने तिला ही मुलगी दिल्याचे तपासात उघडकीस आलं आहे. अटकेनंतर या दोघींनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहनाज रेहमान शेख ही महिला वांद्रे येथील जुने वांद्रे टर्मिनस, पाईपलाईन झोपडपट्टीत राहते. ती भीक मागण्याचे काम करते. तिला फातिमा नावाची एक तीन वर्षांची मुलगी आहे. 30 मार्चला फातिमा ही घरासमोर खेळत होती, खेळताना ती अचानक गायब झाली. तिचा तिच्या आईसह स्थानिक रहिवाशांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे शहनाजने निर्मलनगर पोलिसांत फातिमाच्या मिसिंगची तक्रार केली होती. याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता.

या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या टीमने या मुलीचा शोध सुरु केला यावेळी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले होते. वांद्रे रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर ही मुलगी चर्चगेट लोकलमध्ये चढल्याची दिसून आली होती. त्यानंतर प्रत्येक रेल्वे स्थानकातील फुटेज पाहिल्यानंतर ती चर्चगेट रेल्वे स्थानकात एका महिलेसोबत दिसली. ही शोधमोहीम सुरु असतानाच मंत्रालयाजवळील बेस्ट बसस्टॉप फुटपाथवर राहणार्‍या मीरा काळे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिने या मुलीचे अपहरण केल्याची कबुली दिली. त्यानंतर मीना पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्या तावडीतून फातिमाची सुखरुप सुटका केली.

मूल होत नसल्यामुळे केलं अपहरण

चौकशीत मीनाला लग्नानंतर मूल होत नव्हते, त्यामुळे एकट्या मुलीला पाहून मीराने तिला उचलून नेले आणि मीनाच्या स्वाधीन केले. चौकशीत आलेल्या या माहितीनंतर या दोघींविरुद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. याच गुन्ह्यांत त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्यांना 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फातिमाचा ताबा तिच्या पालकांकडे सोपविण्यात आला आहे.

First Published on: April 13, 2019 10:23 AM
Exit mobile version