सार्वजनिक शौचालयांमध्ये तृतीयपंथीयांसाठीही स्वच्छतागृह

सार्वजनिक शौचालयांमध्ये तृतीयपंथीयांसाठीही स्वच्छतागृह

मुंबई महापालिकेच्यावतीने सार्वजनिक शौचालयांची उभारणी करताना पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था केली जाते. परंतु राईट टू पीच्या लढ्यानंतर मुंबईत महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांमध्येही वाढ होवू लागली आहे. पण आता महिलांसोबतच तृतीयपंथीयांसाठी स्वच्छतागृह बांधण्याचा विचार प्रशासन करत आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने विविध अशासकीय संस्थांच्या समन्वयाने गर्दीच्या ठिकाणी महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक शौचालयांची उभारणी केली जाते. या सर्व शौचालयांचे व्यवस्थापन संबंधित संस्थांच्या माध्यमातून करण्यात येते. या शौचालयांमध्ये आतापर्यंत पुरुष व महिलांसाठी शौचकुपांची तसेच मुतारींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींसाठीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याच धर्तीवर तृतीयपंथी व्यक्तींसाठी सुविधा देण्यासंबंधी विचार करण्यात येईल,असे घनकचरा व्यवस्थापनाच्या विभागाने स्पष्ट केले.

दोन वर्षांपूर्वी भाजपच्या नगरसेविका दक्षा पटेल यांनी ठरावाच्या सूचनेंतर्गत महापालिकेने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयांमध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवण्यात यावी,अशी मागणी केली होती. जेणेकरून तृतीयपंथीयांना दिलासा मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

मुंबईत मोक्याच्या ठिकाणी महिला व पुरुष याकरता स्वतंत्र व्यवस्था असलेली सार्वजनिक शौचालये बांधली आहेत. यापुढेही बांधण्यात येतील, असे असले तरी अशा शौचालयांचा वापर करताना तृतीयपंथीयांना संकोच वाटतो आणि त्यांची गैरसोय होते. त्यामुळे सार्वजनिक शौचालयांमध्ये तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र अशी व्यवस्था असणे हितावह असल्याचे त्यांनी म्हटले होते.

वापरासंदर्भात होणार अभ्यास
याबाबत विभागाने दिलेल्या माहितीनुसार,तृतीयपंथीयांकडून अशाप्रकारची मागणी केली जात आहे. तसेच नगरसेवकांकडूनही मागणी होत आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांकडून सार्वजनिक शौचालयांचा वापर कुठल्या भागांमध्ये आणि कुठल्या शौचालयांमध्ये अधिक होता, याचा अभ्यास करून त्याप्रमाणे स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याचा विचार केला जाईल,असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

First Published on: January 14, 2020 7:04 AM
Exit mobile version