मुंबईसाठी १ लाख ८८ हजार लसीचा साठा

मुंबईसाठी १ लाख ८८ हजार लसीचा साठा

मुंबईत लसीचा साठा संपत आल्याने गेल्या दोन दिवसात १२० पैकी ९० लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. उर्वरित लसीचा साठा शनिवारी पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. त्यामुळे लसीच्या तुटवड्याचा लसीकरणावर विपरीत परिणाम झालेला आहे.

दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मुंबईला कोविड शिल्ड लसीचा १ लाख ८८ हजार इतका साठा मिळणार, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

मात्र जर लसीचा हा साठा लवकरात लवकर उपलब्ध झाला तरच मुंबईत लसीकरण केंद्रे सुरू ठेवता येतील. अन्यथा लसीकरणावरून मोठा गदारोळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

तसेच, मुंबईत शुक्रवारी रात्री उपलब्ध होणार्‍या लसीच्या नवीन साठ्यामधून, लसीचा प्रथम डोस घेतलेल्या नागरिकांना, कर्मचार्‍यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे.

मोबाईलवर मेसेज आलेल्यांनाच लसीचा डोस
लसीचा निर्माण झालेला तुटवडा पाहता, यापुढे ज्यांच्या मोबाईलमध्ये लसीकरणाचा संदेश असेल त्यांनाच लस दिली जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. मुंबईला लसीचा नवीन साठा प्राप्त झाल्यावर, शनिवारी पुन्हा एकदा लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. ज्यांना लसीचा दुसरा डोस देणे आवश्यक आहे, त्यांना लसीचा डोस प्राधान्याने दिला जाणार आहे.

पालिकेला लसीचा मोठा साठा येत्या १५ एप्रिल रोजी उपलब्ध होणार आहे. मात्र, तोपर्यंत १ लाख ८८हजार इतका लसीचा साठा पुरवावा लागणार आहे. त्याप्रमाणे पालिकेला नियोजन करावे लागणार आहे. ज्या नागरिकांना लसीचा डोस घेण्याबाबत त्यांच्या मोबाईलवर मेसेज येईल, त्यांनाच प्राधान्याने लसीचा डोस देण्यात येणार आहे. मात्र, नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

First Published on: April 10, 2021 5:50 AM
Exit mobile version