राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; सव्वातीन हजार लिटरचा ताडीसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; सव्वातीन हजार लिटरचा ताडीसाठा जप्त

ताडीसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये केलेल्या कारवाईत अवैधरित्या साठवणूक केलेला ३ हजार ३०० लीटर ताडीसाठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारेवर्मा यांनी दिली आहे.

२ हजार २७५ लीटर ताडीसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क, ठाणे कार्यालयाचे अधीक्षक नितीन घुले, पालघर कार्यालयाचे अधीक्षक डॉ.व्ही. टी. भुकन आणि त्यांच्या पथकाने वसई तालुक्यातील भुईगाव, कळंब, नवापूर या ठिकाणी अवैध ताडीसाठ्यावर छापे मारण्यात आले आहेत. यामध्ये राजू म्हात्रे या व्यक्तीच्या घराजवळ विनापरवाना सुमारे २ हजार २७५ लीटर ताडीसाठ्याचे कॅन आढळून आले आहे. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन राजू म्हात्रे फरार झाला असून त्यास दारुबंदी गुन्ह्यामध्ये फरार म्हणून घोषित करण्यात आले आहे. नाळा गावातील ताडीमालक विरेंद्र रवींद्र म्हात्रे हा छापा पडू नये, म्हणून आपल्या घराजवळील ताडी टेम्पोमध्ये ३५ लिटरचे २० कॅन भरत असताना त्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले आहे. तसेच जप्त करण्यात आलेली ताडी ही फार दिवसांची असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. दोन्ही आरोपी हे बऱ्याच दिवसांची शिळी ताडीसाठा करुन मुंबईठाणे परिसरात बेकायदेशीर ताडीची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विरेंद्र म्हात्रेला अटक करण्यात आली आहे.

शिळ्या ताडीची विक्री

नवापूर येथे प्रदीप डोंगरीकर याच्या घरी देखील दारुबंदी गुन्ह्यांतर्गत छापा घातला असता २४ तासांपेक्षा जास्त कालावधीची ३२५ लिटर ताडी आढळून आली आहे. हा शिळी ताडी मुंबई उपनगर जिल्ह्यातील जुहू, विलेपार्ले, अंधेरी, सांताक्रुझ, कांदिवली पोयसर आणि मुंबई शहर जिल्ह्यातील चौपाटी वाळकेश्वर येथील दुकानात पाठविण्यात येत असल्याबाबतची कागदपत्रे आढळून आली. त्यामुळे या पाच दुकानांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे तसेच या दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्याचे प्रस्ताव मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहेत. गतवर्षीही ताडी दुकानदारांवर केलेल्या कारवाईत 24 तासांपेक्षा अधिक शिळ्या ताडीचा साठा केलेल्या मुंबई आणि ठाणे येथील १३ दुकानदारांवर विभागीय गुन्हे दाखल केले होते. त्यामध्ये मुंबई उपनगरमधील ताडी दुकाने १५ दिवसांसाठी बंद केली होती.


हेही वाचा –  धक्कादायक! कासवाच्या पोटात आढळले १०४ प्लास्टिकचे तुकडे


 

First Published on: October 9, 2019 9:19 PM
Exit mobile version