ठाण्यात महासभेच्या दिरंगाईवरून भाजप गटनेत्याचे महापौरांवर शरसंधान! 

ठाण्यात महासभेच्या दिरंगाईवरून भाजप गटनेत्याचे महापौरांवर शरसंधान! 

ठाण्यात महासभेच्या दिरंगाईवरून भाजप गटनेत्याचे महापौरांवर शरसंधान! 

एकिकडे राज्यात सत्ता स्थापनेवरून शिवसेना भाजपमध्ये कुरघोडी सुरू असतानाच, दुसरीकडे ठाण्यात महासभा लावण्यात दिरंगाई केली जात असल्याच्या कारणावरून भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी महापौर मिनाश्री शिंदे यांच्यावर शरसंधान केले आहे. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतरही महासभेची तारीख जाहीर न करणे म्हणजे “न उलगडणारे कोडे” आहे. महापौरांना महासभा बोलाविण्याचा अधिकार असूनही, अशा पद्धतीच्या दिरंगाईमुळे सामान्य ठाणेकरांचे हित साधणार नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला आहे.

नेमके काय घडले?

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आलेली आहे. मात्र, अजूनही महापौरांनी महासभा बोलावलेली नाही. गेल्या साडेतीन महिन्यांपासून महासभा घेण्यात आलेली नाही याकडे पवार यांनी महापौरांचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. महापालिकेची शेवटची महासभा २० ऑगस्ट रोजी झाली होती. तत्पूर्वी १९ जुलै रोजीची महासभा तहकूब करण्यात आली. महासभा रखडल्यामुळे सप्टेंबर महिन्यात विशेष महासभा घेण्याबाबत भाजपच्यावतीने पत्र देण्यात आले होते. मात्र, त्याबाबत काहीही निर्णय घेण्यात आला नाही. गेल्या साडेतीन महिन्यांतील आचारसंहितेचा काळ वगळता महासभा का घेण्यात आली नाही, हे माझ्यासह भाजपा नगरसेवकांना एक `न उलगडणारे कोडे’ आहे, असे देखील पवार यांनी महापौरांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. पालिकेच्या २०१९-२० च्या अर्थसंकल्पातील निधीतून घेण्यात येणारी कामे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. यंदाच्या आर्थिक वर्षातील सात महिन्यांचा कालावधी संपुष्टात आला असून, संपूर्ण कामे पूर्ण होण्यासाठी दिरंगाई होण्याची शक्यता आहे. ठाणेकरांच्या दृष्टीकोनातून अनेक प्रश्न रखडले असून, सभेच्या पटलावर अनेक विषय प्रलंबित आहेत. या विषयांवर तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. राज्यभरात आचारसंहिता उठविण्यात आली आहे. गेल्या महिनाभराहून अधिक काळ आचारसंहितेमुळे प्रशासनावरील बंधने संपली. त्यामुळे महापालिकेचा कारभार गतिमान होण्यासाठी तातडीने महासभा घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्यानंतरही महासभा जाहीर करण्याबाबत दिरंगाई का केली जाते, असा सवाल पवार यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने महासभा लावण्यात आलेली नव्हती. तसेच मागील सभाही तहकूब झाल्या होत्या. आता आचारसंहिता संपली असून, लवकरच महासभा बोलवण्यात येणार आहे.  – मिनाश्री शिंदे, महापौर ठामपा
First Published on: November 5, 2019 8:47 PM
Exit mobile version