ऑनलाईन मैत्रिणीने लाखोंना गंडवले; ठाण्यातील ५२ वर्षीय गृहस्थाची फसवणूक

ऑनलाईन मैत्रिणीने लाखोंना गंडवले; ठाण्यातील ५२ वर्षीय गृहस्थाची फसवणूक

प्रातिनिधिक छायाचित्र

‘इन्स्टाग्राम’ वर महिलेसोबत झालेली मैत्री ठाण्यातील ५२ वर्षीय व्यक्तीला चांगलीच महागात पडली आहे. या महिलेने ‘ब्रेस्ट कॅन्सर’ या आजारावरील बीया भारतातून पाठवण्याच्या नावाखाली एका ठाणेकराला चक्क २२ लाख ७८ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

ठाण्यातील माजिवाडा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत ५२ वर्षीय गृहस्थ आपल्या कुटुंबियांसह राहण्यास आहे. एका बड्या कंपनीत नोकरी करणाऱ्या या गृहस्थाची ‘इन्स्टाग्राम’ या सोशल साईटवर काही महिन्यांपूर्वी लॉरा डॉरा या कथित महिलेसोबत ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. या महिलेने तिचा व्हॉट्सअप क्रमांक या गृहस्थाला दिला होता. ती अमेरिका येथे राहण्यास असून एका खासगी कंपनीत सेक्रेटरी या पदावर नोकरी करीत असल्याचे ५२ वर्षीय गृहस्थांना सांगितले.

अमेरिकेतील एक औषध कंपनी ब्रेस्ट कँन्सर या आजारावर औषध तयार करते, त्या औषधासाठी लागणाऱ्या बिया (सिड्स) या भारतात खूप स्वस्त असून अमेरिकेत या बिया खूप महाग विकल्या जात आहे. माझी आत्या एका फार्मसी कंपनीत कामाला असून ती आपल्याकडून त्या बिया विकत घेईल. त्यातून आपल्याला खूप मोठा नफा होऊ शकतो, असे सांगून कथीत लॉरा डॉरा या महिलेने दिल्लीतील एका एजंटचा मोबाईल क्रमांक देऊन तो तुम्हाला बियाचे सॅम्पल पाठवेल ते सॅम्पल अमेरिकेच्या एजंटला पाठवण्यास सांगितले.

या गृहस्थाने एजंटच्या मोबाईलवर फोन करून बियाचे सॅम्पल मागवले. तीन सॅम्पलची किंमत दोन लाख २५ हजार असल्याचे सांगून अगोदर ऑनलाईन पेमेंट करा बिया तुम्हाला घरपोच मिळतील, असे सांगण्यात आले. फसवणूक झालेल्या गृहस्थाने एजंटने दिलेल्या बँक खात्यावर सव्वा दोन लाख पाठवले. मात्र बरेच दिवस उलटूनही बियाचे सॅम्पल आले नाही म्हणून चौकशी केली असता कंपनीला ३ नाही तर १० पाकिटे हवे असल्याचे सांगण्यात आले आणि यासाठी वेगवेगळे बँक खाते क्रमांक देऊन पेमेंट करण्यास सांगितले.

सांगितल्या प्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या खात्यावर २२ लाख ७८ हजार रुपये ऑनलाईन जमा केले. मात्र बियांची डिलिव्हरी काही त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही आणि सर्वांचे फोन बंद झाले होते. आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याची माहिती कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली.

First Published on: July 13, 2020 7:59 PM
Exit mobile version