दाऊद टोळीची ठाण्याच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी

दाऊद टोळीची ठाण्याच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी

ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे

ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या हस्तकाकडून धमकी देणारा फोन आल्यामुळे ठाण्याच्या पालिका वर्तुळात खळबळ माजली आहे. ‘ठाण्यात कुणाशी पंगा घेऊ नका. तुम्हाला फॅमिलीसोबत नीट राहायचं आहे ना? मग सांगतोय ते ऐका, नाहीतर तुम्हाला परिवारासह ठार मारू’, अशी धमकी समोरच्या व्यक्तीने फोनवर दिली आहे. आपण दाऊदचा हस्तक बोलत असल्याचं समोरच्या व्यक्तीने सांगितलं. त्यामुळे या प्रकाराची बरीच चर्चा ठाण्यामध्ये होऊ लागली आहे. या प्रकरणी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

धमकीवर तर्क-वितर्क सुरू

अवघ्या काही दिवसांवर राज्यातल्या विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्यामुळे त्याआधीच महापौर मीनाक्षी शिंदे यांना आलेल्या या धमकीच्या फोनमुळे अनेक तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. धमकी देणाऱ्याचा रोख नक्की कुणाकडे होता? याविषयी अंदाज वर्तवले जाऊ लागले आहेत.

‘मी कुणाला घाबरत नाही’

आज पुरुषार्थ संपत चालल्याचे दिसत आहे. माझ्या सारख्या महापौर असलेल्या महिलेला दाऊदचे हस्तक धमकावतात हे निंदनीय आहे. मी कुणाला घाबरत नाही. दाऊदच्या हस्तकांमध्ये हिंमत असेक तर त्यांनी समोर येऊन धमकी द्यावी. मी महापौर म्हणून निर्भिडतेने काम करत आहे. माझा कुणाशी पंगा झाल्याचं मला आठवत नाही.

मीनाक्षी शिंदे, महापौर, ठामपा

First Published on: September 18, 2019 10:02 PM
Exit mobile version