मलमूत्रमिश्रित सांडपाण्यावरील भाजीवर धडक मोहिम

मलमूत्रमिश्रित सांडपाण्यावरील भाजीवर धडक मोहिम

ठाण्याच्या महापौरांनी केली भाजीवर कारवाई

ठाण्याच्या रेल्वे ट्रॅक नजीकच्या जागेत तसेच ठाणे शहरातील विविध ठिकाणी भाजीच्या मळ्यात भाजीपाल्यांसाठी मलमूत्रमिश्रित सांडपाणी वापरले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या तक्रारींवर महापौरांनी धडक कारवाई केली आहे. यावेळी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या सर्व संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, असे आदेश महापौरांनी दिले.

रेल्वेस्थानकात पिकवण्यात येणारी भाजीपाल्यांवर मलमूत्रमिश्रित पाण्याचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी अनेकदा उपस्थित करण्यात आल्या होत्या. याबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील तक्रार केली होती. ही गंभीर बाब लक्षात घेऊन महापौर नरेश म्हस्के यांनी गेल्या आठवड्यात सर्व सहाय्यक आयुक्तांची बैठक घेतली. तसंच, असे प्रकार ज्या ठिकाणी होत असतील त्यांच्यावर कारवाईचे आदेश ‍दिले होते, त्यानुसार शुक्रवारी वर्तकनगर प्रभागसमितीच्या सहाय्यक आयुक्त चारुशीला पंडित यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह धडक मोहिम हाती घेऊन समतानगर येथील पाण्याच्या टाकीजवळील भाजीमळ्यांवर कारवाई केली.

महापालिका कार्यक्षेत्रात बहुतांशी ठिकाणी विशेषत: रेल्वे ट्रॅकजवळच्या मोकळ्या जागेत भाजीचे मळे आहेत, याठिकाणी बोअरवेल किंवा ‍विहीर असल्याचे दाखवून प्रत्यक्षात मात्र पिकांसाठी मलमूत्रमिश्रीत सांडपाणी तसेच गटाराचे पाणी वापरण्यात येते. अशाप्रकारच्या भाजीपाल्याचे सेवन केल्यामुळे अनेक दुर्धर आजार फैलावत आहे आणि याची जाणीव सर्वसामान्य नागरिकांना नसते. अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी भाजीमळे आहेत, या सर्व ठिकाणची पाहणी आणि मातीचे नमुने घेऊन यामध्ये दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला ‍दिले होते, त्यानुसार समतानगर येथील भाजीमळ्यामध्ये प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात आली.

यावेळी रस्त्याखालून पाईपलाईन टाकून संपूर्ण भाजीमळ्याला सांडपाणीच पुरवत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी असलेली विहीर केवळ देखाव्यापुरती असून संपूर्ण मळ्याला सांडपाणीच वापरले जात आहे अशी कबुली देखील संबंधित मळे मालकांनी दिली.

ही बाब अत्यंत गंभीर आणि धोकादायक समतानगर येथील संपूर्ण मळा आणि आजूबाजूचे चार मळे जेसीबीच्या सहाय्याने उखडून पाईपलाईन देखील काढून टाकण्यात आली. यावेळी नाल्यावर बसवलेले पंप देखील प्रशासनाने जप्त केले आहेत. अशा प्रकारची कारवाई सातत्याने सुरू ठेऊन ज्या ज्या ठिकाणी सांडपाण्यावर भाजीमळे असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितलं.

या कारवाईपूर्वी महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने या ठिकाणी वापरण्यात येणारे पाणी, माती आणि भाजीचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केली. या तपासणीत वापरण्यात येणारे पाणी हे सदोष असल्याचे आढळून आल्यानंतर समतानगर येथे ही कारवाई करण्यात आली असल्याचे सहाय्यक आयुक्त डॉ. चारुशीला पंडित यांनी सांगितले. अशा प्रकारे मानवी जीवनाशी अप्रत्यक्षरित्या अवहेलना करणाऱ्या सर्व संबधितांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ३७६ अ प्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असून पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल करण्यात यावे, असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी ‍ दिले आहेत.

First Published on: January 24, 2020 10:36 PM
Exit mobile version