५०० नेत्रहिनांच्या जीवनात प्रकाशवाट

५०० नेत्रहिनांच्या जीवनात प्रकाशवाट

Shreepad and pushpa Agashe

२१ व्या शतकातही अंधश्रद्धा आणि अज्ञानाचा प्रचंड पगडा असल्याने देशात नेत्रदानाबाबत आजही सर्व स्तरांमध्ये जागृती नाही. मात्र ठाण्यातील श्रीपाद आगाशे आणि पुष्पा आगाशे हे दांम्पत्य गेली ३७ वर्षे एका ध्येयाने प्रेरित होऊन मरणोत्तर नेत्रदानाची चळवळ राबवित आहेत. या कार्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केले आहे. आपल्या चळवळीतून आगाशे दांम्पत्यांनी ५०० नेत्रहिनांच्या जीवनात प्रकाशाची पहाट आणलीय. तर जवळपास १० हजार नागरिकांकडून नेत्रदानासाठी फॉर्म भरून घेतले आहेत.

आगाशे दांम्पत्य हे १९८१ पासूनच नेत्रदानाचा प्रचार- प्रसार करीत आहेत. गेल्या ३७ वर्षे ते पदरमोड करून नेत्रदानाची चळवळ राबवित आहे. आतापर्यंत जवळपास त्यांनी विविध ठिकाणी ३५० व्याख्याने दिली आहेत तर १२५ स्टॉल लावून प्रदर्शने भरवली आहेत. पोस्टर्स व बॅनर्स हे स्वत:च्या पैशातूनच ते करीत असतात. राज्यातील विविध भागात केलेल्या प्रचार प्रसारातून जवळपास १० हजार लोकांकडून त्यांनी नेत्रदानासंदर्भात फॉर्म भरून घेतले आहेत. तर दीड लाख माहितीपत्रकही वाटली आहेत. नेत्रदानाचा प्रचार प्रसार करताना चांगले वाईट दोन्ही अनुभव आले आहेत. मात्र नेत्रदानाबाबतची अंधश्रध्दा अज्ञान आजही दिसून येत असल्याचे आगाशे सांगतात.

अणुशक्ती खात्यात नोकरीला असताना त्यांची बदली तामीळनाडू येथे झाली होती, त्यावेळी १९८० साली रिडर्स डायजेस्ट मधील एक लेख त्यांच्या वाचनात आला. श्रीलंकेसारखा देश ३६ देशांना नेत्र पुरवितो हे वाचून आश्चर्य वाटले. नेत्रदानाविषयी अधिक माहीती घेतली त्यानंतर नेत्रदानाचा प्रचार- प्रसार करण्याचे ठरवले. १९८१ साली तामिळनाडूतील कल्पाक्कम येथे आम्ही नेत्रदानाचे पत्रक लावल्यानंतर १२०० जणांनी नेत्रदानासाठी फॉर्म भरल्याचे आगाशे सांगतात. तेथून नेत्रदानाची चळवळ सुरू झाली. त्यांच्या पत्नीचीही त्यांना साथ मिळाली आणि आगाशे दांम्पत्याने नेत्रदानाच्या प्रचाराचा वसा हाती घेतला.

१९९१ ला मुंबईत आल्यानंतर आगाशे यांची नेत्रदानाची चळवळ सुरूच होती. मुंबई, ठाणे किंवा कोणत्याही भागात साहित्य संमेलन असो किंवा एखादा सामाजिक मेळावा श्रीपाद आगाशे यांच्या नेत्रदानाच्या प्रचाराचा स्टॉल हमखास दृष्टीस पडतो. मेकॅनिकल ड्राफ्समन म्हणून अणुशक्ती खात्यातून निवृत्त झाल्यावर या कौशल्यावर त्यांना खासगी कामे करून पैसे कमावता आले असते. पण, त्याऐवजी त्यांनी नेत्रदानाच्या प्रसाराचे ध्येय ठरवले. सरकारी सेवेत असताना ते फक्त शनिवार-रविवार सुटीच्या दिवशी नेत्रदानाच्या प्रचाराचे काम करीत पण निवृत्त झाल्यावर त्यांनी स्वतःच्या खिशातील पैसा खर्च करून राज्यात नेत्रदानाचा प्रचार सुरू केला. नेत्रदानाबाबत सुशिक्षितांपेक्षा अशिक्षितांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. नेत्रदानात पुरूषांपेक्षा महिला आघाडीवर असल्याचे दिसून येते असे ते सांगतात.

आतापर्यंत नेत्रदानात भरण्यात आलेल्या फॉर्ममध्ये ८० टक्के महिला आहेत, असे पुष्पा आगाशे यांनी सांगितले. नेत्रदानात तरूणांनी मोठया प्रमाणात पुढाकार घ्यायला हवा. आजचा तरूण हा विज्ञानवादी आहे. तसेच आपल्या कुटूंबातील व्यक्तींच्या मृत्यूनंतर नेत्रदानाच्यावेळी तरूणच निर्णय घेत असतात. त्यामुळे तरूणांनी पुढाकार घ्यावा, असे पुष्पा आगाशे म्हणतात. आई वडीलांच्या नेत्रदानाच्या चळवळीत त्यांची दोन्ही मुले अनिल आणि आशिष हे सुध्दाकाम करीत आहेत. त्यामुळे आगाशे कुटूंब नेत्रदान चळवळीत रमून गेले आहेत.

भारतात नेत्रदानाविषयी मोठ्या प्रमाणावर जागृती होणे आवश्यक आहे. श्रीलंकेसारखा लहान देश भारतासारख्या मोठ्या देशाला दरवर्षी दहा हजार नेत्र पुरवितो, त्याचबरोबर आणखी ३६ देशांनाही श्रीलंकेतून नेत्रपुरवठा केला जातो. मात्र भारतासारख्या सुमारे १२५ कोटींची लोकसंख्या असलेल्या देशात उदासीनात आहे. सव्वाशे कोटीच्या देशात सव्वा कोटी अंध आहेत. त्यामध्ये ३० लाख लोकांचे अंधत्व नेत्रदानामुळे दूर होऊ शकते. देशात ८५ लाख मृत्यू पावतात. त्यातील अवघे ३० हजार व्यक्तीच नेत्रदान करतात. त्यामुळे नेत्रदानाविषयी जागरूकता नाही अशी खंत आगाशे व्यक्त करतात.

First Published on: September 23, 2018 6:27 AM
Exit mobile version