घोडबंदरपलीकडे ३ हजार हेक्टर जमिनीवर नवीन ठाणे

घोडबंदरपलीकडे ३ हजार हेक्टर जमिनीवर नवीन ठाणे

ठाणे घोडबंदर खाडीपलिकडे असलेल्या मोकळ्या जागेत ३ हजार हेक्टरच्या विस्तीर्ण जागेवर नवीन ठाणे शहर विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यास ठाणे महापालिका व एमएमआरडीए यांनी सुरुवात केली आहे. घोडबंदरपासून अवघ्या १७ किमी अंतरावर हे नवीन ठाणे साकारणार आहे.

नवीन ठाण्याच्या उभारणीला वेग आला असून कासारवडवली ते खारबाव अशा खाडीवरील ४०० मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचा कामासाठी सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला आहे. या सल्लागारापोटी ७२ लाख ६० हजारांचा खर्च ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. खाडीपलीकडे असलेल्या गावांचा विकास, रोजगार निर्मिती, १६ छोटी मोठी ग्रोथ सेंटर, ७५ हजार परवडणारी घरे असा तब्बल ३ हजार हेक्टर जमिनीवर हे नवीन ठाणे विकसित केले जाणार आहे. उड्डाणपुलाच्या कामासाठी सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव आज होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत आहे. मागील काही वर्षे या ठाण्याच्या विकासासाठी पावले उचलण्यात आली होती. परंतु त्याचा मुहूर्त सापडत नव्हता. आता खर्‍या अर्थाने नवीन ठाण्याच्या विकासाला वेग आला आहे. या भागात तब्बल ३ हजार हेक्टरवर नवीन ठाणे वसवले जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तब्बल ७५ हजार परवडणारी घरे निर्माण करण्याचा पालिकेचा मानस असणार आहे.त्यानुसार या नव्या शहराची लोकसंख्या ही सुमारे चार लाखांच्या घरात जाणार आहे. आलिशान घरे बांधली तर कमी लोकसंख्या येथे सामावली जाणार असून इतर सोयी सुविधांवर सुध्दा ताण येण्याची भीती आहे. त्यामुळे महापालिकेला परवडवणारी घरे बांधणे हाच मानस राहणार आहे. तर एमएमआरडीएने या भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार १६ छोटी मोठी ग्रोथ सेंटर येथे निर्माण केले जाणार आहेत. याशिवाय एमएमआरडीएच्या माध्यमातून या भागात रोजगाराच्या संधी सुध्दा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. येथे येणार्‍या कामगारांच्या निवार्‍याची जबाबदारी पालिका उचलणार आहे.

दरम्यान त्या दृष्टीने दळणवळण व्यवस्था ही त्यातील महत्त्वाचा भाग मानला जात आहे. त्याअनुषंगाने कासारवडवली ते खारबाव असा खाडी पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यानुसार आता या कामासाठी सल्लागार नेमण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून केले जात आहे. या सल्लागाराच्या माध्यमातून खाडीवर पूल बांधण्याच्या कामी सर्व्हेक्षण करणे, प्रस्ताव तयार करणे आणि पर्यावरण व इतर विभागाची आवश्यक ती परवानगी घेण्यासाठी या सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे.

खाडी पलीकडे असलेली खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी नागरे या महसुली गावांचा विकास केला जाणार आहे. नवीन ठाण्याच्या विकासाच्या मार्गातील एक एक अडथळे टप्प्याटप्प्याने दूर होत आहे. त्यानुसार गायमुख ते खारबाव हा खाडी पूल तयार करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या पुलामुळे नवीन ठाणे अगदी ठाणे शहराच्या जवळ येणार आहे. या पुलाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासंदर्भातील प्रस्ताव फेब्रुवारी २०१९ च्या महासभेत मंजूर झाला होता. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात दळणवळण व्यवस्थेवर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे.

अलिबाग-वसई मल्टिमॉडेल कॉरिडोर नवीन ठाण्याला जोडणार

एमएमआरडीए अलिबाग ते वसई विरार असा मिल्टमॉडेल कॉरिडोर उभारत असून तो नव्या ठाण्यातील खारबाव या गावातून जातो. हा कॉरिडोर घोडबंदर रोड ते मोघरपाडा येथील ४० मीटर डिपी रस्त्याने जोडण्याची तरतूद एमएमआरडीएच्या विकास आराखड्यात आहे. त्यामुळे नवीन ठाणे अगदी जवळ येणार आहे. विशेष म्हणजे या नवीन ठाण्याच्या दिशेने मल्टिमॉडेल कॉरिडोर जात असल्याने आजूबाजूचे सर्व नॅशनल हायवेजवळ येणार आहेत. ही एक या शहरासाठी मुख्य आणि सर्वात महत्त्वाची जमेची बाजू ठरणार आहे.

First Published on: February 4, 2020 5:40 AM
Exit mobile version