शुद्ध पाण्यासाठी 30 वर्षाची प्रतिक्षा संपली

शुद्ध पाण्यासाठी 30 वर्षाची प्रतिक्षा संपली

शुद्ध पाणी

ठाण्यातील हाजुरी लुईसवाडी परिसरातील रहिवाशांना बृहन्मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तब्बल 30 वर्षानंतर शुद्ध पाण्याचा पुरवठा झाला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी महापौर मिनाश्री शिंदे उपस्थित होत्या. त्यामुळे तब्बल 30 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर हाजुरी, लुईसवाडी, रामचंद्र नगर , काजुवाडी , रघुनाथनगर , अंबिका नगरचा काही भाग व नामदेववाडी या परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार आहे.

गेल्या 30 वर्षापासून बृहन्मुंबई महापालिकेकडील प्रक्रिया न केलेल्या 30 दश लक्ष लिटर प्रतिदिन पाणी पुरवठ्यापैकी हाजुरी येथील संयोजनाद्वारे ठाणे महानगरपालिकेस 22.5 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पुरवठा केला जात होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून फक्त क्लोरीनेशन करून नागरिकांना पुरवठा करण्यात येत होता. या पाणी पुरवठ्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसांत गढूळपणा वाढल्याने नागरिकांच्या पाणी पुरवठ्याबाबतच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत होत्या. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बृहन्मुंबई महापालिकेकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

यासाठी महापालिकेच्या वतीने नवीन जलजोडणी आकार आणि अनामत म्हणून 3 कोटी 16 लक्ष रुपयांची अनामत रक्कमही भरण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने सर्व्हिस रोड व धर्मवीर मार्ग या जंक्शनवर बृहन्मुंबई महापालिकेकडून शुद्ध पाण्याचे कनेक्शन उपलब्ध करून घेऊन ठाणे महापालिकेच्या जलवाहिनीस जोडलेले आहे. जोडणी केलेल्या जलवाहिनीतून 22 . 5 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पुरवठा हाजुरी, लुईसवाडी , रामचंद्र नगर, काजुवाडी, पुनाथ नगर, अंबिका नगरचा काही भाग व नामदेववाडी भागास होणार असून सुमारे एक लाख लोकसंख्येस प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी मिळणार आहे.

First Published on: August 3, 2019 2:02 AM
Exit mobile version