माहिममध्ये अपहरणकर्त्याला अटक

माहिममध्ये अपहरणकर्त्याला अटक

दोन महिन्यांच्या मुलाचे अपहरण करुन पळून जाणार्‍या एका अपहरणकर्त्याला काही तासांत दादर रेल्वे पोलिसांनी कुठलाही पुरावा नसताना शिताफीने अटक केली. शहाबाज बक्षी शेख असे या 26 वर्षीय आरोपी अपहरणकर्त्याचे नाव असून त्याच्या तावडीतून मुलाची सुखरुप सुटका झाली आहे. 25 हजार रुपयांसाठी त्याने या मुलाचे अपहरण केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. आरोपीला पुढील चौकशीसाठी माहीम पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मधु अर्जुन परमार ही महिला तिचा पती आणि दोन जुळ्या मुलांसोबत माहीम येथील सेनापती बापट मार्गावरील मोरी रोड फुटपाथवर राहते. बुधवारी पहाटे चार वाजता तिला जाग आली असता तिचा चंदू नावाचा दोन महिन्यांचा मुलगा तिथे नसल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने दादर रेल्वे पोलिसांना हा प्रकार सांगितला. या घटनेची वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली. या मुलाचा शोध सुरू असताना दादरच्या मध्य-पश्चिमेला जोडणार्‍या नवीन स्कायवॉकवर एक इसम मुलाला घेऊन जात असल्याचे पोलिसांना दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे नाव शहाबाज शेख असल्याचे उघडकीस आले. तो माहीम येथील रेतीबंदर परिसरात राहत असून त्यानेच चंदूचे अपहरण केल्याची कबुली दिली. याकामासाठी त्याला राजू नावाच्या व्यक्तीने पैशांचे आमिष दाखविले होते. चंदूला त्याच्याकडे दिल्यानंतर तो त्याला 25 हजार रुपये देणार होता.

First Published on: June 27, 2019 4:56 AM
Exit mobile version