आमदार निवासमध्ये चोरी करणार्‍या आरोपीस अटक

आमदार निवासमध्ये चोरी करणार्‍या आरोपीस अटक

प्रातिनिधिक फोटो

आमदार निवासमध्ये चोरी करणार्‍या एका आरोपीस कफ परेड पोलिसांनी अटक केली. निलेश प्रफुलचंद कर्नावट असे या 30 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा जळगावच्या पाचोरा, नांद्र माहिजीचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने मंगळवार 26 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. निलेशने आतापर्यंत मनोरा आणि आकाशवाणी आमदार निवासमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे. चोरीनंतर तो पुण्याच्या जैन मंदिरात काही दिवस वास्तव्य करुन पुन्हा चोरीसाठी मुंबई शहरात येत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.

नेताजी वसंतराव पाटील हे शेतकरी असून ते सांगलीचे रहिवाशी आहेत. 7 जानेवारीला रात्री गावाहून मुंबईत आले होते. मुंबई शहरात राहण्याची व्यवस्था नसल्याने ते स्थानिक आमदार शिवाजीराम नाईक यांच्या मनोरा आमदार निवासमध्ये वास्तव्यास होते. यावेळी त्यांच्यासोबत सुनिल शिरनाळ, तुलसीदास आणि विवेक गायकवाड हेदेखील राहत होते. रात्री उशिरा बॉम्बे रुग्णालयाजवळील पंचवटी हॉटेलमध्ये जेवण करुन ते मनोरा आमदार निवासमध्ये गेले होते. रात्री उशिरा त्यांच्या रुममध्ये आलेल्या एका अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पॅण्टच्या खिशातून सुमारे 42 हजार रुपयांची कॅश, बँकेचे दोन एटीएम कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड, आमदार निवासमध्ये राहण्याचा पाच वर्षांचा परवाना आदी मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते.

हा प्रकार दुसर्‍या दिवशी नेताजी पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी कफ परेड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांन अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता. शुक्रवारी कफ परेड पोलिसांचे एक विशेष पथक मनोरा आमदार निवास परिसरात गस्त घालत होते. यावेळी तिथे एक तरुण संशयास्पद फिरत होता. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने स्वत:चे नाव प्रविण सुभाषण पाटील असे सांगून तो जळगाव असल्याचे सांगितले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर तो खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले.

अखेर त्याने तो प्रविण पाटील नसून निलेश कर्नावट असल्याचे उघडकीस आले. त्यानेच ही चोरी केल्याचे सांगितले. त्याने आतापर्यंत मनोरा आणि आकाशवाणी आमदार निवासमध्ये चोरी करुन मुंबईतून पळ काढल्याचे तसेच चोरीनंतर काही दिवस पुण्यातील जैन मंदिरात वास्तव्य केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या अटकेची माहिती त्याचे वडिल प्रफुलचंद कर्नावट यांना देण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी आहे. त्याच्या अटकेने चोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

First Published on: February 25, 2019 4:42 AM
Exit mobile version