सोळा वर्षांच्या मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस अटक

सोळा वर्षांच्या मुलीच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस अटक

लोकल ट्रेन

मुंबई । भांडुप येथे राहणार्‍या एका सोळा वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ओमहरी सत्यनारायण सिंग नावाच्या आरोपीस मंगळवारी दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले. याच गुन्ह्यांत तो सध्या शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. ही घटना सोमवारी रात्री दादर रेल्वे स्थानकात लोकलमध्ये चढताना घडली. सोळा वर्षांची ही तक्रारदार मुलगी भांडुप परिसरात राहते. सोमवारी ती तिच्या एका मित्रासोबत दादर रेल्वे स्थानकात आली होती. दादरहून ते दोघेही भांडुपला जाणार होते.

रात्री नऊ वाजता रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी होती. लोकलमध्ये चढताना तिला एका अज्ञात व्यक्तीने नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता, हा प्रकार तिने तिच्या मित्राला सांगितल्यानंतर ते दोघेही लोकलमधील प्रत्येक व्यक्तीकडे पाहत होते, यावेळी कुर्ला रेल्वे स्थानक आल्यानंतर तिने या व्यक्तीला ओळखले. घाटकोपर येथून पुन्हा कुर्ला रेल्वे स्थानकात आल्यानंतर तिने या व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी विनयभंगासह पोस्कोच्या गुन्ह्यांची नोंद केली होती.

मात्र हा गुन्हा दादर रेल्वे स्थानकात घडल्याने त्याचा पुढील तपास दादर रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या पथकाने मंगळवारी विनयभंगाच्या गुन्ह्यांत ओमहरि सिंग याला अटक केली. कोर्टात हजर केल्यानंतर त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

First Published on: January 17, 2019 4:19 AM
Exit mobile version