त्या आरोपींनी मुंबईत घेतले होते नऊ ठिकाणी लसीकरण कॅम्प

त्या आरोपींनी मुंबईत घेतले होते नऊ ठिकाणी लसीकरण कॅम्प

door to door vaccination : केंद्राचा मोठा निर्णय, देशात नोव्हेंबरपासून घरोघरी जाऊन होणार लसीकरण

कांदिवली येथील हिरानंदानी परिसरातील एका सोसायटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कथित लसीकरणप्रकरणी पाच आरोपींना कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. महेंद्र सिंग, संजय गुप्ता, चंदन सिंह, नितीन वसंत मोडे आणि करीम अकबर अली अशी या पाचजणांची नावे आहेत. यातील करीमला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आले असून त्याला शनिवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे तर इतर चौघांना कोर्टाने 25 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींनी मुंबई आणि उपनगरात नऊ ठिकाणी अशाच प्रकारे लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

30 मे 2021 रोजी कांदिवली येथील एस. व्ही. रोडवरील हिरानंदानी हेरिटेज क्लब हाऊस येथे एका लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या लसीकरणासाठी सोसायटीच्या 390 सभासदांनी कोवीशिल्डची लस घेतली होती. त्यासाठी प्रत्येक सभासदांनी 1260 रुपये भरले होते, अशाच प्रकारे लसीकरण आयोजित करणार्‍या व्यक्तींनी संबंधित सभासदांकडून सुमारे साडेचार लाख रुपये घेतले होते. लसीकरण झाल्यानंतर सोसायटीच्या सभासदांनी प्रमाणपत्राची मागणी केली होती, यावेळी आयोजकांनी त्यांच्या डाटाची मागणी केली होती. हा डाटा मिळाल्यानंतर त्यांनी त्यांना तीन वेगवेगळ्या संस्थेचे लस देण्यात आल्याचे प्रमाणपत्र दिले होते, त्यांना कोवीशिल्ड ही लस कोवीन अ‍ॅपद्वारे देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते, हा प्रकार संशयास्पद वाटताच एका सभासदाने कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची कांदिवली पोलिसांनी गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली होती, यावेळी लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करणार्‍या काही आयोजकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले होते, त्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध भादवीसह आयटी आणि साथीचे रोग अधिनियम कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी महेंद्र सिंग, संजय गुप्ता, चंदन सिंह आणि नितीन मोडे या चौघांना अटक केली.

First Published on: June 19, 2021 2:15 AM
Exit mobile version