भिवंडीत विघ्नहर्त्या गणेशाच्या आगमनाला खड्डयांचे ‘विघ्न’!

भिवंडीत विघ्नहर्त्या गणेशाच्या आगमनाला खड्डयांचे ‘विघ्न’!

भिवंडी गणपती आगमन

गणेशोत्सव जवळ आल्याने सर्वत्र गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर गणेश मंडळांमध्ये बाप्पाच्या आगमनाची तय्यारी सुरु झाली आहे. अनेक मंडळांनी आपापल्या बाप्पाला मखरात विराजमान करण्यासाठी लगबग सुरु केली आहे. असे असले तरी भिवंडी मनपाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून आता विघ्नहर्त्या गणेशाच्या आगमन मिरवणुकीला या खड्डयांचे विघ्न येत आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये मनपा प्रशासना विरोधात तीव्र संताप पसरला आहे.

२ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. त्यामुळे विविध सार्वजनिक उत्सव मंडळानी मुंबई व परिसरातून मोठमोठ्या गणेश मूर्ती वाजत गाजत आणण्यास सुरवात केली आहे. रविवारी सकाळी कल्याण रोड मार्गावर खराब रस्ता व उड्डाणपूल कामामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काप आळी यांच्या गणेश मूर्ती मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटणास्थळी धाव घेऊन गणेशमुर्ती मार्ग मोकळा करत रस्ता मोकळा केला. वाहतूक कोंडी सोडवली, मात्र खराब व नादुरुस्त झालेल्या रस्त्यांवरून गणेश मूर्ती आणल्या जात असल्यामुळे गणेशोत्सव मंडळानी तीव्र नाराजी व्यक्त केेली आहे. महापालिका प्रशासनाकडे रस्ते दुरुस्ती बाबतीत निवेदन देऊन सुद्धा पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

हे वाचा – धुळ्यात कंटेनर-एसटी बसचा अपघात; चालकासह १० ठार, २० जखमी

भिवंडीतील रस्त्यांवर पालिकेने पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीच्या नावे कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. मात्र मुसळधार पावसात या दुरुस्त केलेल्या रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सव जवळ आल्याने या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी लेखी मागणी गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष मदन भोई, माजी अध्यक्ष सल्लागार शरद भसाळे, सदानंद पिंपळे यांनी मनपा प्रशासनाकडे लेखी निवेदन देऊन केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान, सकाळी मुंबई येथून घुंगट नगर, संयुक्त मित्र मंडळ गौरीपाडा व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काप आळी यांनी कल्याणरोड येथील रस्त्यावर पडलेले खड्डे चुकवत आपल्या गणेश मूर्ती आणल्या. खराब रस्त्यामुळे इच्छीतस्तळी पोहचण्यासाठी सुमारे दोन तास लागले त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. अनेक मंडळांनी पेण, वसई, मुबई आदी ठिकाणाहून गणेश मुर्ती आणण्यास सुरूवात केली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे श्रींच्या मूर्तीला अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिकेने तातडीने उपाय योजना करून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी गणेशोत्सव मंडळांनी केली आहे.

First Published on: August 19, 2019 10:16 AM
Exit mobile version