‘त्या’ ब्लू बेबी बाळाचा मुंबईतील डॉक्टरांनी वाचवला जीव

‘त्या’ ब्लू बेबी बाळाचा मुंबईतील डॉक्टरांनी वाचवला जीव

बाळाचे पालक

शिर्डी परिसरात राहणाऱ्या एका ५ महिन्यांच्या बाळाचा मुंबईतील एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांना जीव वाचवण्यात यश आलं आहे. या बाळाला ब्लू बेबी या आजाराचं निदान झालं होतं. या आजारात बाळाला ‘टोटल अॅनोमॅलॉस पल्मनरी वेनॉस कनेक्शन’ हा हृदयदोष होता. रक्तात ऑक्सिजन न पोहोचल्यामुळे या बाळाची त्वचा सतत निळी पडत होती. त्यामुळे या बाळाला नेमका काय आजार झाला आहे? याचं निदान होऊ शकत नव्हतं. शिवाय, या बाळाच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती ही बेताची असल्याकारणाने उपचार कसे आणि कुठे करायचे हा देखील प्रश्न होता. जन्मानंतर सतत दम लागणं, श्वास घेण्यास त्रास होणं, त्वचा निळी पडणं अशा अनेक समस्यांना या बाळाला तोंड द्यावं लागत होतं. शिर्डीतील स्थानिक डॉक्टरांकडून उपचार करुन घेतल्यानंतर बाळाची तब्येत सुधारत नव्हती. अशातच स्थानिक डॉक्टरांनी मुंबईत नेण्याचा सल्ला देत बाळाच्या उपचारांसाठी आई-वडिलांनी मुंबई गाठली.

खर्च परवडणारा नसतानाही बाळाच्या आई-वडिलांनी त्याला एच. एन. रिलायन्स या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे त्याची तपासणी केली असता, त्याला ब्लू बेबी ज्याला वैद्यकीय भाषेत ‘टोटल अॅनोमॅलॉस पल्मनरी वेनॉस कनेक्शन’ हा हृदयदोष असल्याचं निदान झालं. त्याच्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून जीव वाचवला.

हे बाळ हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सुरूवातीला आम्ही इको करून पाहिला. या चाचणी अहवालात बाळाच्या हृदयात दोष असल्याचं लक्षात आलं. जन्मतः त्याला ब्लू बेबी हा दुर्मिळ आजार होता.
– डॉ. मांगलेश निंबाळकर, बालहृदयरोग तज्ज्ञ, एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल

आठ तास शस्त्रक्रिया 

मिशन मुस्कान या प्रकल्पाअंतर्गत या बाळावर कार्डियाक बायपास सर्जरी करण्यात आली. विशेष तंत्राचा वापर करून बाळाच्या हृदयाच्या डावीकडील कप्प्यातील दोन प्रवेश मोकळे केले. साधारणतः आठ तास ही शस्त्रक्रिया केली गेली. आता या बाळाची प्रकृती उत्तम असून त्याला घरी सोडण्यात आलं आहे, असं डॉ. निंबाळकर यांनी सांगितलं.

एक टक्का मुलांमध्येच आढळतो 

डॉ. अनुपमा नायर यांनी सांगितलं की, ‘‘या बाळाला जन्मापासून हृदयविषयक गुंतागुंत होती. या आजाराला ‘टोटल अॅनोमॅलॉस पल्मनरी वेनॉस कनेक्शन’ (TAPVC) असं म्हणतात. यात हृदयापर्यंत रक्त पोहोचवणाऱ्या रक्तवाहिन्या अरुंद असतात आणि विचित्र पद्धतीने हृदयाशी जोडलेल्या असतात. त्यामुळे, रक्तपुरवठा आणि श्वसनात अडथळा निर्माण होतो. हा आजार फक्त एक टक्का मुलांमध्येच आढळून येतो.’’

First Published on: April 19, 2019 7:51 PM
Exit mobile version