सुर्या धरणाची क्षमता वाढणार

सुर्या धरणाची क्षमता वाढणार

वसई-विरार आणि मिरा -भाईंदर महापालिकेला पाणी पुरवठा करणार्‍या सुर्या धरणाच्या पाणीसाठी क्षमतेत वाढ करण्याचा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतला आहे. सुर्या प्रकल्पांतर्गत कवडास उन्नैयी या बंधार्‍याचे बांधकाम करून १३.४१ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. एरव्ही सुर्या धरणातून ओव्हरफ्लो होणार्‍या पाण्याची साठवण करण्यासाठी हा प्रकल्प एमएमआरडीएकडून हाती घेण्यात आला आहे.

सध्याचा धरणासाठी असणारा बंधारा हा अनेक वर्षे जुना आहे. त्यामुळेच सुर्या धरणाच्या खालील बाजुस असलेला कवडास बंधार्‍या नजीकच उन्नैयी हा बंधारा बांधवा. त्यावर गेट बसवण्यात यावेत, अशी मागणी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडून एमएमआरडीएला करण्यात आली होती. तसेच प्रकल्पासाठी निधी पुरवावा अशी मागणीही महामंडळाकडून करण्यात आली होती. या प्रकल्पासाठी १८४.६ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असून सुर्या धरण प्रकल्पातील भांडवली खर्च म्हणून या निधीचा समावेश होणार आहे. नुकत्याच या खर्चासाठी एमएमआरडीएच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. धरण क्षेत्राच्या पाणी साठा क्षमतेत वाढ झाल्याने आगामी काळात सिंचन क्षेत्रातील संभाव्य तूटदेखील कमी होणार आहे. नव्या बंधार्‍याच्या माध्यमातून सध्याच्या बंधार्‍याच्या दुप्पट पाणी उपलब्ध होणार आहे.

कवडास बंधार्‍याच्या खालील भागात नदी पात्रात पाच कोकण टाईप बंधारे तयार करून २.२९ दशलक्ष घनमीटर इतके पाणी साठवणे शक्य होणार आहे. त्यासाठी अतिरिक्त ५५.२९ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. या पाच बंधार्‍यातील पाणी पुढे मासवण येथील बंधार्‍यात पाईपलाईनद्वारे पाठवून वसई -विरार महापालिकेसाठी पाणी वापरणे शक्य होणार आहे. विरारच्या म्हाडा वसाहतींना तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील ग्रामीण भागासाठी या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. मुंबई एमएमआरडीए भागासाठी १५ दशलक्ष लीटर प्रतिदिन इतका पाणी पुरवठा राखीव ठेवण्यात आलेला आहे.

सुर्या धरणाच्या पाण्याचा वापर पाईपलाईनच्या माध्यमातून वसई -विरार तसेच मिरा -भाईंदर महापालिकेसाठी करून देण्याच्या प्रकल्पासाठी केंद्रातून दुसर्‍या टप्प्यातील परवानगी प्रलंबित आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाच्या अंतिम मंजुरीनंतर या प्रकल्पाला वेग येईल. या प्रकल्पाला परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांनी दिली. या प्रकल्पाच्या निमित्ताने पाईलपाईल लगतच्या १५ गावांना नाममात्र दराने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

First Published on: August 17, 2019 5:23 AM
Exit mobile version