मुख्यमंत्र्यांना ‘वर्षा’ची भीती नाही; मातोश्री परिसरातील तुंबई यंदापासून थांबणार

मुख्यमंत्र्यांना ‘वर्षा’ची भीती नाही; मातोश्री परिसरातील तुंबई यंदापासून थांबणार
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मातोश्री निवासस्थानी राहत असले तरी त्यांना ‘वर्षा’ची भीती नाही. दरवर्षीच्या पावसाळ्या वांद्रे पूर्व येथील कलानगर परिसरात पावसामुळे तुंबई होते. परंतु यापुढे मातोश्रीच्या परिसरात पाणी तुंबणार नाही याची विशेष काळजी घेत महापालिकेने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने विकासकामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसात मातोश्रीच्या आसपास पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे किती वर्षाची बरसात झाली तरी मातोश्रीला दरवर्षीच्या तुलनेत तुंबलेल्या पाण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही.

मुंबईतील प्रत्येक पावसाळ्यात वांद्रे पूर्व येथील पूर्व द्रुतगती महामार्ग आणि कलानगर परिसरात पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे येथील ओएनजीसी नाल्याचे रुंदीकरण करण्याचे काम महापालिकेने यापूर्वीच हाती घेतले होते. परंतु या नाल्याच्या रुंदीकरणानंतरही तातडीच्या उपाययोजना म्हणून येथील चार ठिकाणी पाण्याचे निचरा करणारे पंप बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ओएनजीएसी नाला आणि बॉक्स ड्रेन या ठिकाणी दोन गेट तयार करून तिथे ५ पंप बसवले जाणार आहेत. तर नंदादीप गार्डनजवळील ड्रायव्हींग पोस्टजवळ दोन गेट बनवून तिथे ३ पंप, एमएमआरडीएच्याठिकाणी १ गेट बनवून तिथे १ पंप आणि बीकेसी मेट्रो स्टेशनच्याठिकाणी ३ गेट बनवून ५ पंप बसवणे आदींची योजना आखून ही कामे हाती घेतली. प्रत्येक पंपाची पाणी वाहून नेण्याची क्षमता ही ताशी १ हजार घनमीटर एवढी आहे. त्यामुळे एकाच वेळी १४ पंपाचा वापर केल्यास ताशी १४ हजार घनमीटर पाण्याचा निचरा करणे शक्य होणार आहे. लॉक-डाऊनच्या काळात यासाठी कंत्राटदारांची नेमणूक करून ही कामे सुरु करण्यात आली होती. मात्र, ही कामे येत्या आठ दिवसांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित असल्याची माहिती पर्जन्य जलविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ३ जून रोजी बीकेसी मेट्रो स्टेशनजवळील फ्लड गेटची पाहणी केली होती. त्यानंतर हे काम अधिक पूर्ण करण्यात येत आहे. याठिकाणी असलेल्या कंत्राटदाराची माणसे गावी निघून गेली असली तरी कंत्राटदाराने नियोजित वेळेत हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची  पराकाष्ठा केलेली आहे. त्यामुळे या कामावर शेवटचा हात फिरवला जात असून येणाऱ्या पहिल्या मुसळधार पावसात या पंपाद्वारे किती प्रमाणात पाण्याचा निचरा होतो, याचे प्रात्यक्षिक पाहिले जाणार आहे.

फ्लड गेट आणि त्यात किती पंप बसवले जाणार ?

ओएनजीएसी नाला आणि बॉक्स ड्रेन या ठिकाणी २ गेट- ५ पंप

नंदादीप गार्डनजवळील ड्रायव्हींग पोस्टजवळ २ गेट -३ पंप,

एमएमआरडीएच्याठिकाणी १ गेट -१ पंप

बीकेसी मेट्रो स्टेशनच्याठिकाणी ३ गेट- ५ पंप

First Published on: June 11, 2020 8:06 PM
Exit mobile version