आयुक्तांनी जनतेची दिशाभूल करू नये; भाजप नगरसेविकेने घेतला समाचार

आयुक्तांनी जनतेची दिशाभूल करू नये; भाजप नगरसेविकेने घेतला समाचार

भाजप नगरसेविका राजेश्री शिरवडकर

मुंबईत सुमारे ७०० रुग्णवाहिका उपलब्ध असून आतापर्यंत रुग्णालयातील अडीच हजार खाटा रिकाम्या असल्याचा दावा महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी करत जुलैच्या मध्यापर्यंत कोरोनाचा आजार नियंत्रणात येईल,असा विश्वास व्यक्त केला. परंतु आधी रुग्णांना रुग्णवाहिका व खाटा वेळीच उपलब्ध करून द्याव्यात. मग प्रशासनाने असा दावा करावा, असा शब्दात भाजप नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी समाचार घेतला आहे. प्रत्येक विभागात १० रुग्णवाहिका असल्याचाचा दावा करणाऱ्या आयुक्तांनी आकडेवारीची गणिते मांडून जनतेला उल्लू बनवू नये, असेही सुनावले आहे.

भाजपच्या नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांचे नातेवाईक मुलुंड तांबे नगर येथे राहतात. त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातील महिला या ३६ वर्षाच्या असून त्या गरोदर आहेत. त्यामुळे त्यांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यासाठी वॉर्डाच्या सहायक वैद्यकीय अधिकाऱ्याला कल्पना दिला होती. मात्र तरी त्यांनी कोरोना बाधित रुग्णांला खासगी रुग्णालयात दाखल करण्याची कोणतीही व्यवस्था केली नाही. सकाळपासून प्रयत्न करूनही रुग्णाला बेड उपलब्ध होत नसल्याने तसेच रुग्णवाहिकाही मिळत नसल्याने अखेर शिरवडकर यांनी पती आणि बहिणीसह मुलुंडला धाव घेतली. तोपर्यंत खासदार मनोज कोटक, नगरसेविका समिता कांबळे यांच्या प्रयत्नाने रुग्णालयात खाट उपलब्ध आहे का याचा शोध सुरुच होता.

फोर्टीस रुग्णालयात जागा नसल्याने अखेर लिलावतीत जागा उपलब्ध झाल्याची माहिती मिळाली. परंतु ही मंडळी तिथे पोहोचली तरी रुग्णवाहिका दाखल झाली नव्हती. त्यानंतर काही तासांनी ओमनी रुग्णवाहिका दाखल झाली. परंतु ही रुग्णवाहिका सॅनिटाईज केलेली नव्हती. एका बाधित रुग्णाला सोडून आल्यानंतर थेट रुग्णवाहिका तिथेच आली होती. त्यामुळे शिरवडकर यांचे पती राजेश शिरवडकर यांनी आपल्या वाहनातील सॅनिटाईज मशिनने रुग्णवाहिका सॅनिटाईज केली. त्यातच विशेष म्हणजे चालकाने पीपीई किट धारण केले नव्हते. शिरवडकर यांच्या वाहनात असलेले पीपीई किट घालून त्यांच्या बहिणीने मग त्या गरोदर महिलेला व त्यांचे सामान खाली उतरवून रुग्णवाहिकेत बसवले. मात्र, यासर्व प्रक्रियेला आठ तासांहून अधिक काळ लोटला गेला.

महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला कोरोना बाधित महिला ही गरोदर असल्याची कल्पना देवूनही त्यांनी महापालिकेसह ८० टक्के कोट्यातील खासगी रुग्णालयात खाटांची व्यवस्था केली नाही. त्यातच कहर म्हणजे त्यांनी गरोदर महिलेसाठी ओमनी रुग्णवाहिका पाठवली. एकाबाजुला महापालिका आयुक्त हे रुग्णवाहिकांची सेवा आणि रुग्णालयात बेड मिळेल असे सांगत आहेत. परंतु विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे नगरसेविका तक्रार करूनही प्रशासन योग्यप्रकारे दखल घेत नाही. तर मग सामान्य माणसांची काय अवस्था असेल,असा प्रश्न त्यांनी व्यक्त केला.

मुंबईतील प्रत्येक विभागाला १० रुग्णवाहिका दिल्याचा दावा आयुक्त करतात. पण टी विभागात केवळ ४ रुग्णवाहिका आहेत. खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटांचे नियोजन करत रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आयुक्त सांगतात. परंतु ना वॉर्डात रुग्णवाहिका आहेत ना खासगी रुग्णालयातील खाटांवर महापालिकेचे कोणते नियोजन आहे. महापालिकेच्याच अधिकाऱ्यांना विभागात तसेच आसपास कोणत्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत याचीच माहिती नाही. तर हे रुग्णांना कुठे आणि कसे दाखल करणार असा संतप्त सवाल शिरवडकर यांनी केला. विभागाचे सहायक आयुक्त व विभागाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क करूनही त्यांचाशी होवून न शकल्याने त्यांचे सहायक असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. परंतु त्यांनाच काही कल्पना नसते.

त्यामुळे आयुक्तांनी एवढ्या रुग्णशय्या रिकाम्या आहेत असा जो काही खोटा दावा केला आहे, तो दावा त्यांनी मागे घ्यावा. आयुक्तांनी एक दिवस वेशांतर करून रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना किती तासांमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध झाली आणि रुग्ण खाटांसाठी तास प्रतीक्षा करावी लागली याची माहिती जाणून घ्यावी. केवळ आकड्यांची गणिते मांडून जनतेला उल्लू बनवू नये, अशा शब्दांत त्यांनी आयुक्तांचा समाचार घेतला.


शवागृहातील शवांच्या विल्हेवाटीला ‘या’मुळे होतोय विलंब

First Published on: June 23, 2020 7:08 PM
Exit mobile version