ऐन सुट्ठीत मुलांच्या खेळांवर गदा

ऐन सुट्ठीत मुलांच्या खेळांवर गदा

Kdmc Ground

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली क्रीडासंकुलाचा ताबा निवडणूक विभागाने घेतल्याने निवडणूक होईपर्यंत मुलांना खेळता येणार नाही. त्यामुळे ऐन सुट्टीत मुलांच्या खेळावर गदा आल्याने नाराजी पसरली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे मतदान 29 एप्रिलला होणार आहे. डोंबिवली क्रीडासंकुलाची खूप मोठी जागा आहे. त्यामुळे निवडणुकीचे साहित्य ठेवण्यासाठी तसेच निवडणुकीच्या कामासाठी बाहेरून येणार्‍या कर्मचार्‍यांसाठी निवार्‍याची सोय या ठिकाणी केली जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र नार्वेकर यांनी निवडणुकीच्या कामासाठी डोंबिवली क्रीडासंकूल उपलब्ध करून देण्यासंदर्भात पालिका आयुक्तांना सूचना केल्या होत्या, त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच निवडणूक आयेागाने या क्रीडासंकुलाचा ताबा घेतला. त्यामुळे एप्रिल- मे महिन्यात शाळा, कॉलेजला सुट्टी पडल्यानंतर खेळाडूंना क्रीडासंकुलात खेळाचा आनंद लुटता येणार नाही.

क्रीडासंकुलात बंदिस्त क्रीडागृह, व्यायामशाळा, तरण तलावाचा वापर करता येणार नाही. तरण तलावात सहाशेच्या आसपास आजीवन सदस्य असून, उन्हाळी सुट्टीत तरण तलावाचा आनंद घेण्यार्‍यांची दिवसभरात पाचशेच्या आसपास संख्या असतेे. त्यामुळे व्यायामशाळा व तरण तलावावर निर्बंध टाकू नका, अशी मागणीही काही लोकप्रतिनिधींनी आयुक्तांकडे केली होती. मात्र, निवडणूक विभागाने क्रीडासंकुलाचा ताबा घेतल्याने ऐन सुट्टीत मुलांच्या खेळाचा आनंद हिरावला जाणार आहे.

First Published on: March 19, 2019 4:21 AM
Exit mobile version