महापौरांच्या निर्णयावर युवासेनेची कुरघोडी

महापौरांच्या निर्णयावर युवासेनेची कुरघोडी

मुंबईतील २७ वाहनतळांशेजारील ५०० मीटर परिसरातील वाहनांवर महापालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई सुरु असून यामुळे जनतेमध्ये प्रचंड संताप पसरलेला आहे. महापौरांसह शिवसेनेच्या महापालिकेतील नेत्यांनी मंजुरी दिल्यानंतर या दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली. असे असतानाच शुक्रवारी युवा सेनेचे पदाधिकारी असलेल्या आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले आणि जी-दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष समाधान सरवणकर यांनी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची भेट घेवून स्थानिकांना वाहनतळांच्या शुल्कात ५० टक्के सवलत देण्याची मागणी केली. आयुक्तांनी, ही मागणी मान्य केल्यामुळे शिवसेनेच्या तिसर्‍या पिढीतील नेतृत्वाची महापालिकेत चलती असल्याचे स्पष्ट होत आहे.

ज्या शिवसेनेने, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर करून आयुक्तांना अनधिकृतपणे उभ्या करण्यात येणार्‍या वाहनांवर कारवाई करण्याची परवानगी दिली, त्याच पक्षाच्या दोन नगरसेवकांनी परस्पर आयुक्तांची भेट घेवून महापालिकेच्या वाहनतळांमध्ये स्थानिक रहिवाशांच्या वाहनांसाठी ५० टक्के सवलत देण्याची मागणी केली. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार, या दोन्ही नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली. परंतु ही भेट घेताना, युवा सेनेच्या अध्यक्षांनी तसेच त्यांच्या दोन्ही शिलेदारांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष तसेच सभागृह नेत्या यांना विश्वासातच घेतले नाही. त्यावर महापालिकेच्यावतीने संबंधित रहिवाशांच्या एका वाहनाला विशिष्ट प्रकारचा पास उपलब्ध करून दिला जाईल. हा पास एका घरामागे एका वाहनांसाठीच असेल. परंतु दुसरे वाहन असल्यास त्यासाठी त्यांना पूर्ण शुल्क आकारले जावे, अशी सूचना केलेली आहे. त्याप्रमाणे ही सवलत दिली जाईल, असे अमेय घोले आणि समाधान सरवणकर यांनी स्पष्ट केले.

First Published on: July 13, 2019 4:09 AM
Exit mobile version