देशाला आज काँग्रेसचीच गरज

देशाला आज काँग्रेसचीच गरज

एकनाथ गायकवाड

गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता आहेत, मात्र त्यानंतरही मुंबईत पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण उडते. आज मुंबईत खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या शिवसेना आणि भाजप सरकारने मुंबईला खड्ड्यात टाकले आहे. इतकेच नव्हे तर आज या सरकारमुळे आपला भारत देश संकटात आहे. देशाला आता काँग्रेसचीच खरी गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे माजी खासदार आणि नवनियुक्त मुंबई कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी रविवारी मुंबईत काढले. तर देशाबरोबरच मुंबईला पण खर्‍या अर्थाने काँग्रेसचीच गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मुंबई काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्या उपस्थितीत रविवारी एकनाथ गायकवाड यांनी कार्याध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी मिलिंद देवरा यांच्यासह कृपाशंकर सिंह, चंद्रकांत हंडोरे, वर्षा गायकवाड, नसिम खान आणि मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

माझ्यामध्ये लढण्याची ताकद आज ही आहे. मी काँग्रेसचा होतो, आहे आणि कायम राहणार आहे. काँग्रेस माझ्या रक्तात आहे. काँग्रेस पक्षाने माझ्यावर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली, माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि मिलिंद देवरा यांचे आभार मानतो,असे एकनाथ गायकवाड म्हणाले. मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यावेळी म्हणाले की, ज्यावेळी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निकालाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी मी देखील मुंबईतील निकालाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. माझा राजीनामा अजून पक्षाने मंजूर केलेला नाही. त्यावेळी मला विचारण्यात आले की मुंबईसाठी काय केले पाहिजे तेव्हा मीच त्यांना विनंती केली की कार्याध्यक्ष निवडा आणि मीच एकनाथ गायकवाड यांचे नाव सुचविले कारण एकनाथ गायकवाड हे आम्हाला सर्वांना वरिष्ठ आहेत.

First Published on: July 29, 2019 4:37 AM
Exit mobile version